Infosys Buyback 2025: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिस लिमिटेडनं (Infosys Limited) आपल्या बहुप्रतिक्षित १८,००० कोटी रुपयांच्या मेगा बायबॅक कार्यक्रमासाठी 'रेकॉर्ड डेट'ची (Record Date) घोषणा केली आहे. कंपनीनं मुंबई शेअर बाजारात (BSE) दाखल केलेल्या नियामक फाइलिंगमध्ये सांगितलं की, १४ नोव्हेंबर २०२५ ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे.
या तारखेला कंपनीच्या रजिस्टरमध्ये ज्या गुंतवणूकदारांची नावे नोंदणीकृत असतील, तेच या बायबॅक ऑफरचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतील. इन्फोसिसच्या बोर्डानं११ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत या बायबॅकला मंजुरी दिली होती.
बायबॅकचे स्वरूप आणि प्रमोटर्सची भूमिका
सर्वात मोठा बायबॅक: रकमेनुसार, हा कंपनीच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा बायबॅक असेल.
शेअरची संख्या: या योजनेंतर्गत कंपनी ५ रुपये फेस व्हॅल्यूचे १० कोटी इक्विटी शेअर्स खरेदी करेल, जे एकूण इक्विटीच्या सुमारे २.४१% इतके आहे.
प्रमोटर्सचा सहभाग नाही: विशेष म्हणजे, कंपनीचे प्रमोटर्स आणि प्रमोटर गट, ज्यामध्ये नंदन नीलेकणी आणि सुधा मूर्ती यांच्यासह इतर संस्थापक कुटुंबीयांचा समावेश आहे, ते या बायबॅक ऑफरमध्ये सहभागी होणार नाहीत.
प्रमोटर गट: प्रमोटर्समध्ये सुधा मूर्ती (एन. आर. नारायण मूर्ती यांच्या पत्नी), त्यांची मुलगी अक्षता मूर्ती, मुलगा रोहन मूर्ती, नंदन नीलेकणी, त्यांच्या पत्नी रोहिणी नीलेकणी आणि त्यांची मुले निहार व जाह्नवी नीलेकणी यांचा समावेश आहे.
बायबॅकच्या घोषणेपूर्वी प्रमोटर गटाकडे कंपनीच्या एकूण इक्विटीचा १३.०५% हिस्सा होता.
प्रीमियम आणि मागील बायबॅकचा इतिहास
बायबॅक किंमत: शेअरची बायबॅक किंमत प्रति शेअर १,८०० रुपये निश्चित करण्यात आली आहे, जी सध्याच्या बाजारभावाच्या तुलनेत सुमारे २२% प्रीमियम दरानं आहे.
इक्विटीच्या टक्केवारीत: जरी हा रकमेनुसार सर्वात मोठा बायबॅक असला तरी, इक्विटीच्या टक्केवारीनुसार (४.९%) २०१७ मध्ये झालेला बायबॅक अधिक मोठा होता.
मागील बायबॅक
२०१७: पहिला बायबॅक ₹१३,००० कोटींचा (११.३ कोटी शेअर्स, ४.९२% हिस्सा, ₹१,१५० प्रति शेअर दराने)
२०१९: ₹८,२६० कोटी
२०२१: ₹९,२०० कोटी
२०२२: ₹९,३०० कोटी
इन्फोसिस शेअरची कामगिरी आणि तिमाही निकाल
गुरुवारच्या कामकाजात इन्फोसिसचा शेअर ०.०८% च्या माफक घसरणीसह १,४६६.७० रुपये वर बंद झाला. गेल्या काही दिवसांपासून या आयटी शेअरवर दबाव आहे. वर्षभरात इन्फोसिसच्या शेअरची किंमत १६% नं घसरली आहे. विशेष म्हणजे, या शेअरनं सेक्टरच नव्हे, तर बेंचमार्क निफ्टी आणि सेन्सेक्सपेक्षाही वर्षभरात खराब कामगिरी केली आहे.
दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा (Net Profit) वार्षिक आधारावर १३% वाढून ७,३६४ कोटी रुपये झाला. तर महसूल (Revenue from Operations) ९% वाढून ४४,४९० कोटी रुपये झाला.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
