Infosys ADR News: न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये १९ डिसेंबर रोजी इन्फोसिसच्या एडीआरमध्ये (ADR) ३८ टक्क्यांहून अधिक मोठी उसळी पाहायला मिळाली. या प्रचंड वाढीनंतर तेथील ट्रेडिंग थांबवण्यात आलं. रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार, एडीआरची अंतिम किंमत २७ डॉलर इतकी होती. याच प्रभावामुळे गिफ्टी निफ्टी फ्युचर्समध्येही २२० अंकां पेक्षा जास्त वाढ दिसून आली. तत्पूर्वी, १९ डिसेंबर रोजी भारतीय शेअर बाजारातइन्फोसिसचा शेअर ०.७ टक्क्यांच्या वाढीसह १,६३८ रुपयांवर बंद झाला होता.
मोठ्या बँकेने शेअर्स परत घेतल्याने तेजी
ट्रेडर्सनं सांगितलं की, इन्फोसिसच्या एडीआरमध्ये वाढ ही एडीआरच्या संख्येत अचानक घट झाल्यामुळे झाली. एका मोठ्या बँकेनं बाजारात कर्ज दिलेले मोठ्या प्रमाणात शेअर्स परत मागवले. अचानक परत मागवल्यानं एकूण शेअर्सची संख्या कमी झाली. यामुळे शॉर्ट पोझिशन्स असलेल्या ट्रेडर्सनं तोट्यापासून बचाव करण्यासाठी शेअर्स खरेदी करण्यास प्रवृत्त केलं. यामुळे एडीआरच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली.
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
भारतीय आयटी क्षेत्रातही तेजीचं वातावरण
१९ डिसेंबरच्या सकाळी भारतीय आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये सकारात्मक कल दिसून आला. याचं मुख्य कारण १८ डिसेंबर रोजी जाहीर झालेले 'एक्सेंचर'चे पहिल्या तिमाहीचे निकाल होते. सुरुवातीच्या व्यवहारांत इन्फोसिससह टीसीएस, टेक महिंद्रा, विप्रो आणि एचसीएल टेक यांसारख्या दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ नोंदवली गेली. तसंच अनेक मिडकॅप आयटी कंपन्यांचे शेअर्सही वधारलेले दिसले.
एक्सेंचरच्या तिमाही निकालांचा परिणाम
एक्सेंचरचे पहिल्या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले असून कंपनीच्या महसुलात ५ टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, कंपनीनं संपूर्ण वर्षासाठीचा रेव्हेन्यू गायडंस २-५ टक्क्यांवर कायम ठेवला आहे. यामध्ये अमेरिकन सरकारकडून मिळणाऱ्या व्यवसायातील १ टक्का योगदानाचा विचार करण्यात आलेला नाही. कंपनीनं आर्थिक वर्ष २०२६ साठी आपला ऑरगॅनिक ग्रोथ आऊटलूक ०.५-३.५ टक्क्यांवर स्थिर ठेवला आहे, जे डिस्क्रेशनरी स्पेंडिंगबाबत अजूनही सावध पवित्रा असल्याचं सूचित करतं.
विप्रोच्या एडीआरमध्येही वाढ
इन्फोसिससोबतच विप्रोच्या एडीआरमध्येही ७ टक्क्यांची वाढ झाली असून तो ३.०७ डॉलरवर पोहोचला आहे. एक्सेंचरच्या निकालांमुळे इन्फोसिसच्या एडीआरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम राहिली. १८ डिसेंबर रोजी यात ५ टक्क्यांहून अधिक आणि १७ डिसेंबर रोजी २.५ टक्क्यांची वाढ झाली होती.
