Share Market Today : भारतीय शेअर बाजारात आज, १६ ऑक्टोबर रोजी सलग दुसऱ्या दिवशी मोठी तेजी दिसून आली. तिसऱ्या तिमाहीतील मागणी मजबूत राहण्याच्या अपेक्षा, विदेशी गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे सकारात्मक संकेत आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या मवाळ धोरणामुळे बाजाराला मोठा आधार मिळाला. दिवसाअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ८६२ अंकांनी वधारला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २५,६०० च्या जवळ पोहोचला.
गुंतवणूकदारांची संपत्ती वाढली
बाजारातील या जोरदार तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन बुधवारच्या ४६३.७८ लाख कोटी रुपयांवरून वाढून आज ४६६.८७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. याचा अर्थ, एकाच दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे २.०९ लाख कोटी रुपयांची भर पडली.
क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये दमदार वाढ
आज जवळपास सर्वच क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. निफ्टी एफएमसीजी इंडेक्स २% हून अधिक वाढीसह 'टॉप गेनर' ठरला. निफ्टी कंझ्युमर ड्युरेबल्स आणि निफ्टी ऑटो इंडेक्समध्ये अनुक्रमे १.५% आणि १.३% ची वाढ झाली. निफ्टी प्रायव्हेट बँक १.४८% आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस ०.७% ने वधारले. निफ्टी रिअल्टी इंडेक्सनेही १.९% ची शानदार तेजी दाखवली. केवळ पीएसयू बँक इंडेक्स ०.४४% च्या घसरणीसह लाल निशाणीत बंद झाला.
सेन्सेक्समधील प्रमुख शेअर्सची कामगिरी
आज सेन्सेक्समधील ३० पैकी २८ शेअर्स तेजीसह बंद झाले.
कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक २.६७% ची तेजी राहिली. याशिवाय, टायटन, ॲक्सिस बँक, अदानी पोर्ट्स आणि महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स १.८२% ते २.६३% पर्यंत वाढले. तर इटरनलमध्ये १.७३% आणि इन्फोसिसमध्ये ०.०८% ची किरकोळ घसरण नोंदवली गेली.
वाचा - मोठा नफा कमावूनही कंपनीचा धक्कादायक निर्णय! तब्बल १६,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ
बाजारातील एकूण चित्र
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर एकूण ४,३३४ शेअर्समध्ये व्यवहार झाला. यातील २,३७४ शेअर्स तेजीसह बंद झाले, तर १,८१४ शेअर्समध्ये घसरण झाली. विशेष म्हणजे, आज १६५ शेअर्सनी ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला.