Share Market Today : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरूवारी आणखी एक टॅरिफ बॉम्ब भारतावर टाकला. याचा परिणाज आज शेअर बाजारात चौफेर दिसून आला. बाजारात आज, २६ सप्टेंबर रोजी सलग सहाव्या दिवशी मोठी पडझड दिसून आली. गेल्या सात महिन्यांतील ही सर्वात मोठी आणि दीर्घकाळ चाललेली घसरण ठरली आहे. विशेषकरुन फार्मा आणि आयटी क्षेत्राला याचा मोठा फटका सहन करावा लागला.
व्यवहार संपला तेव्हा सेन्सेक्स ७३३.२२ अंकांनी कोसळून ८०,४२६.४६ च्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी २३६.१५ अंकांनी खाली येऊन २४,६५४.७० च्या स्तरावर स्थिरावला. या भीषण पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे आज एकाच दिवसात तब्बल ६.६५ लाख कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाले.
पडझडीची प्रमुख कारणे
बाजारातील या मोठ्या घसरणीसाठी प्रामुख्याने तीन घटक कारणीभूत ठरले.
- ट्रम्प यांचा टॅरिफचा फटका: डोनाल्ड ट्रम्प यांनी १ ऑक्टोबरपासून ब्रँडेड आणि पेटंट औषधांवर १०० टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यामुळे फार्मा क्षेत्रातील शेअर्स मोठ्या प्रमाणात तुटले.
- कमजोर जागतिक संकेत: अमेरिकेतील टेक कंपनी एक्सेंचरच्या अपेक्षेपेक्षा कमी नफ्याच्या निकालांमुळे आयटी क्षेत्राचे मनोबल खचले.
- विदेशी गुंतवणूकदारांची विक्री: विदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय बाजारात सतत सुरू असलेल्या विक्रीने बाजारावरील दबाव कायम ठेवला.
सर्वाधिक फटका आयटी आणि फार्माला
आज सर्व प्रमुख क्षेत्रीय निर्देशांक लाल निशाणीवर बंद झाले. सर्वाधिक फटका आयटी, फार्मा आणि कंझ्युमर ड्युरेबल्स कंपन्यांना बसला.
आयटी क्षेत्राची स्थिती: निफ्टी आयटी इंडेक्स सुमारे २.५ टक्क्यांनी तुटला, या इंडेक्समध्ये सलग सहाव्या दिवशी घसरण झाली आहे.
इतर क्षेत्र: निफ्टी फार्मा आणि कंझ्युमर ड्युरेबल्स इंडेक्समध्येही २ टक्क्यांहून अधिकची घसरण दिसली.
स्मॉलकॅप-मिडकॅप: ब्रॉडर मार्केटमध्ये, बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्स सुमारे २ टक्क्यांनी तुटले, ज्यामुळे लहान गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला.
गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख रुपये कोटी बुडाले
बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल कालच्या ४५७.३५ लाख कोटी रुपयांवरून आज ४५०.७५ लाख कोटी रुपयांवर आले. म्हणजेच, एका दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ६.६५ लाख कोटी रुपयांची घट झाली.
- सर्वाधिक घसरलेले शेअर्स: सेन्सेक्समधील ३० पैकी २५ शेअर्स खाली आले. यामध्ये महिंद्रा ॲन्ड महिंद्राचा शेअर सर्वाधिक ३.६२ टक्क्यांनी घसरला. टाटा स्टील, बजाज फायनान्स आणि एशियन पेंट्स मध्येही मोठी घसरण झाली.
- वाढलेले शेअर्स: फक्त ५ शेअर्स वाढीसह बंद झाले. यामध्ये लार्सन ॲन्ड टुब्रो सर्वाधिक २.७७ टक्क्यांनी वधारला. टाटा मोटर्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांसारख्या मोठ्या शेअर्सनीही बाजाराला थोडा आधार दिला.
वाचा - सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
आज बीएसईवर एकूण ४,२८० शेअर्समध्ये व्यवहार झाला, त्यापैकी ३,०६४ शेअर्समध्ये घसरण होती. या विक्रीच्या तीव्र वातावरणात १५४ शेअर्सनी ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला.