Share Market Today : सलग तीन दिवसांच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजाराने आज, २६ नोव्हेंबर रोजी, जोरदार पुनरागमन केलं. सेन्सेक्सने १,०२२ अंकांची मोठी झेप घेतली, तर निफ्टी २६,२०० च्या पार पोहोचला. ही गेल्या ५ महिन्यांतील सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांमधील सर्वात मोठी वाढ आहे. अमेरिकेत पुढील महिन्यात व्याज दर घटण्याची शक्यता आणि विदेशी गुंतवणूकदारांचे बाजारात झालेले पुनरागमन, या दोन मुख्य कारणांमुळे बाजारात चौफेर खरेदी दिसून आली.
बाजाराची स्थिती
सेन्सेक्स १,०२२.५० अंकांनी वाढून ८५,६०९.५१ च्या स्तरावर बंद झाला. तर निफ्टी ५० ३२०.५० अंकांच्या तेजीसह २६,२०५.३० च्या स्तरावर बंद झाला. बीएसई स्मॉलकॅप आणि मिडकॅप इंडेक्समध्येही १.३२ टक्क्यांपर्यंतची मजबूत वाढ नोंदवली गेली.
गुंतवणूकदारांची संपत्ती वाढली
बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४७४.८७ लाख कोटी झाले, जे काल ४६९.४१ लाख कोटी होते. यामुळे, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एकाच दिवसात ५.४६ लाख कोटी रुपयांची वाढ झाली.
सर्वच क्षेत्रांमध्ये जबरदस्त खरेदी
शेअर बाजारात आज प्रत्येक सेक्टर हिरव्या निशाणीवर बंद झाला, जी बाजारातील सकारात्मकतेची लाट दर्शवते. मेटल शेअर्समध्ये २% पेक्षा जास्त वाढ झाली. तर बँकिंग, कंझ्युमर ड्युरेबल आणि ऑईल-गॅस क्षेत्रांमध्ये मोठी तेजी दिसली. आयटी आणि खासगी बँक इंडेक्समध्ये १% पेक्षा जास्त, तर ऑटो, फार्मा, हेल्थकेअर, एफएमसीजी आणि रियल्टी सेक्टरही तेजीसह बंद झाले.
सेंसेक्समधील टॉप गेनर्स
सेन्सेक्समधील ३० पैकी २८ शेअर्स तेजीसह बंद झाले.
| कंपनीचे नाव | वाढ (%) |
| बजाज फिनसर्व्ह | २.५१% |
| बजाज फायनान्स | २.३६% |
| रिलायन्स इंडस्ट्रीज | २.२४% |
| सन फार्मा | २.०५% |
| टाटा मोटर्स पॅसेंजर व्हीकल | १.८९% |
घसरलेले शेअर्स
आज फक्त दोनच शेअर्स लाल निशाणीवर बंद झाले.
भारती एअरटेल १.५७% घसरण.
एशियन पेंट्स ०.२२% घसरण.
वाचा - चीनची दादागिरी संपणार! EV आणि संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक 'रेअर अर्थ' खनिजांसाठी सरकारचा मोठा प्लॅन
एकूण बाजाराचे चित्र
बीएसईवर एकूण ४,३२५ शेअर्समध्ये व्यवहार झाला, त्यापैकी २,८१२ शेअर्स तेजीसह बंद झाले. आज ११९ शेअर्सनी ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला, तर १७० शेअर्सनी ५२ आठवड्यांचा नवा नीचांक गाठला. बाजारातील उत्साह परत आल्याने गुंतवणूकदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
