stock market recovery : गेल्या ५ महिन्यापांसून शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची अक्षरशः झोप उडाली होती. बाजार घसरण्याची इतकी सलय झाली होती की आज कितीने घसरला? एवढेच पाहिलं जात होतं. यामध्ये नवीन गुंतवणूकदारांचे जास्त हाल झाले. कारण, त्याच्यासाठी हा पहिलाच मोठा फॉल होता. अनुभवी गुंतवणूकदारांनी माहिती होतं, की हेही दिवस जातील. गेल्या २ दिवसातील बाजाराची प्रगती पाहता हा शब्द खरा ठरत असल्याचे दिसत आहे. गेल्या २ दिवसांपासून बाजारात चांगली रिकव्हरी होताना दिसत आहे. यामध्ये बीएसई लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप पुन्हा ४ ट्रिलियन रुपयांच्या जवळ पोहोचले आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १२ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. अशा स्थितीत बाजाराला अच्छे दिन येणार आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
२ दिवसात १२ लाख कोटींची कमाई
बुधवार आणि गुरुवारी बाजारातील वाढीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे १२ लाख कोटी रुपयांची वाढ झाली. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप गुरुवारी ३९७,१२,३३० कोटी रुपयांवर पोहोचले होते, तर मंगळवारी बाजार बंद झाल्यानंतर ते ३८५,५९,३५५ कोटी रुपये होते. अशाप्रकारे २ ट्रेडिंग दिवसांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ११,५२,९७५ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या २ दिवसांत स्मॉल कॅप आणि मिड कॅप समभागांमध्ये चांगली खरेदी दिसून आली आहे. गुंतवणूकदारांसाठी ही चांगली बातमी आहे. कारण, घसरणीत सर्वाधिक नुकसान स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्सचे झाले होते.
शेअर बाजाराला चांगले दिवस येणार?
२ दिवसांच्या वाढीवर असं मते मांडणे योग्य नाही, असं बाजार तज्ज्ञांच्या मत आहे. पुढील एप्रिल महिन्यात अनेक मोठ्या बातम्या येतील, ज्याचा थेट परिणाम बाजारावर होईल. त्यामुळे बाजाराला चांगले दिवस येतील असे म्हणणे घाईचे ठरेल. देशांतर्गत गुंतवणूकदार ५००० ते ६००० कोटी रुपयांची खरेदी करत आहेत. ज्यामुळे बाजाराला चालना मिळत आहे. दुसरीकडे अमेरिकेने २ एप्रिलपासून भारतावर रेसिप्रोकल टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होतील.
शेअर बाजारात तेजी का आली?
चीन आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी नवीन प्रोत्साहन पॅकेज जाहीर करेल, अशी आशा गुंतवणूकदारांना आहे. ज्याचा थेट परिणाम बेस मेटल (तांबे, ॲल्युमिनियम) सारख्या गोष्टींवर होईल आणि किंमती वाढतील. त्यामुळे सध्या गुंतवणूकदारांनी खरेदी वाढवली आहे. दुसरीकडे मॅक्सिको आणि कॅनडावर टॅरिफ लागू करण्याचा निर्णय १ महिना पुढे ढकलल्याने अमेरिका आणि आशियाई बाजारात हिरवळ दिसत आहे. डॉलर इंडेक्स पडल्याने भारतीय रुपया मजबूत झाला आहे. जर डॉलरची घसरण अशीच चालू राहिली तर परकीय गुंतवणूकदार विक्री थांबवण्याची शक्यता आहे.