Indian Stock Market : गेल्या आठवड्यात दमदार कामगिरी केल्यानंतर, देशांतर्गत शेअर बाजार आज घसरणीसह बंद झाला. आठवड्याच्या पहिल्या दिवशी आयटी आणि ऑटो शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक आज लाल निशाण्यावर बंद झाले. वाढीला ब्रेक लागल्याने गुंतवणूकदारांच्या चिंता पुन्हा वाढू लागल्या आहेत.
सोमवारी, बीएसई सेन्सेक्स ११८.९६ अंकांच्या (०.१५%) घसरणीसह ८१,७८५.७४ अंकांवर स्थिरावला. त्याचप्रमाणे, एनएसईचा निफ्टी ५० निर्देशांकही ४४.८० अंकांच्या (०.१८%) घसरणीसह २५,०६९.२० अंकांवर बंद झाला. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात सेन्सेक्समध्ये १,१९३.९४ अंकांची (१.४७%) आणि निफ्टीमध्ये ३७३ अंकांची (१.५०%) वाढ झाली होती.
निफ्टीतील ५० पैकी ३५ कंपन्यांचे शेअर्स लाल निशाण्यावर
आज सेन्सेक्समधील ३० पैकी केवळ १० कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या निशाण्यावर बंद झाले, तर उर्वरित २० कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. निफ्टी ५० मध्येही ५० पैकी केवळ १५ कंपन्यांचे शेअर्स वाढले, तर ३५ शेअर्स घसरणीसह बंद झाले.
सर्वाधिक वाढ: सेन्सेक्समध्ये बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक ०.६८% वाढ झाली.
सर्वाधिक घसरण: महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स सर्वाधिक १.६७% नी घसरले.
या प्रमुख शेअर्समध्ये वाढ आणि घसरण
आज हिरव्या निशाण्यावर बंद होणाऱ्या सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये अल्ट्राटेक सिमेंट, एलअँडटी, रिलायन्स इंडस्ट्रीज, अदानी पोर्ट्स, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ट्रेंट यांचा समावेश होता.
वाचा - होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
दुसरीकडे, एशियन पेंट्स, इन्फोसिस, टायटन, सनफार्मा, टीसीएस, टेक महिंद्रा, पॉवरग्रिड, टाटा स्टील, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, एचसीएल टेक, कोटक महिंद्रा बँक, आयटीसी, बजाज फिनसर्व, एनटीपीसी आणि एचडीएफसी बँक यांसारख्या प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज घसरण झाली. आयटी आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने बाजारावर दबाव आल्याचे दिसून आले.