Stock Market Today : आज, आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी, म्हणजेच शुक्रवार, ११ जुलै २०२५ रोजी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. बाजारात सर्वच क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे प्रमुख निर्देशांक जवळपास एक टक्क्याने खाली आले. दुपारपर्यंत, बीएसईवरील ३० शेअर्सचा सेन्सेक्स ७०० अंकांनी घसरून ८२,५०९.५९ वर पोहोचला, तर एनएसईवरील निफ्टी-५० देखील २०० अंकांनी घसरून २५,१६२.२५ वर स्थिरावला.
कोण वाढले, कोण घसरले?
आजच्या बाजारात काही मोजके अपवाद वगळता, बहुतेक शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली.
वाढलेले शेअर्स: एफएमसीजी क्षेत्रात वाढ दिसून आली आणि हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे शेअर्स तब्बल ५ टक्क्यांनी वाढले. दुपारपर्यंत ॲक्सिस बँक आणि सन फार्मास्युटिकल्सचे शेअर्सही किरकोळ वाढीसह व्यवहार करत होते.
घसरलेले शेअर्स :
याउलट, आयटी (IT) क्षेत्रात मोठी घसरण झाली. काल जाहीर झालेले टीसीएसचे तिमाही निकाल बाजाराच्या अपेक्षेपेक्षा कमी असल्यामुळे, टीसीएसचा शेअर सुमारे २.७५ टक्क्यांनी घसरला. यामुळे संपूर्ण निफ्टी आयटी निर्देशांक देखील १ टक्क्यांनी खाली आला. रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह यांसारख्या प्रमुख शेअर्समध्येही घसरण झाल्यामुळे बाजारावर मोठा दबाव आला. महिंद्रा अँड महिंद्रा २.४३ टक्के, बजाज फिनसर्व्ह १.७२ टक्के आणि रिलायन्स १.६८ टक्क्यांनी घसरले.
बाजार का कोसळला?
- बाजारातील तज्ज्ञांच्या मते, आज बाजारात आयटी ते ऑटो समभागांपर्यंत प्रचंड विक्रीचा दबाव होता. केवळ एफएमसीजी क्षेत्रातच थोडी वाढ दिसली.
- जागतिक अनिश्चितता : तज्ञांनी सांगितले की, जागतिक अनिश्चिततेमुळे मोठ्या आयटी कंपन्यांचे शेअर्स संघर्ष करताना दिसले.
- टीसीएस निकालांचा परिणाम: टीसीएसच्या तिमाही निकालांनंतर आयटी शेअर्सची कमकुवतता आणि निफ्टी आयटी निर्देशांकात १.८५ टक्क्यांची घसरण यामुळे गुंतवणूकदार निराश झाले.
- ब्रॉडर मार्केटमध्येही घसरण: निफ्टी मिड कॅप १०० मध्येही ०.८६ टक्क्यांनी घसरण झाली, तर निफ्टी स्मॉल कॅप १० मध्येही १.०० टक्क्यांनी घसरण झाली. इंडिया VIX च्या शेअर्समध्ये १.९० टक्क्यांनी वाढ झाली, जी बाजारातील वाढलेली अस्थिरता दर्शवते.
वाचा - शेअर बाजारात तेजी असतानाही २० लाख गुंतवणूकदार पडले बाहेर, कारण वाचून तुम्हीही व्हाल सावध!
आजच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली असून, पुढच्या आठवड्यात बाजार कसा व्यवहार करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.