Share Market : भारतीय शेअर बाजारात आज (बुधवार, १९ नोव्हेंबर) पुन्हा एकदा उत्कृष्ट तेजी पाहायला मिळाली. विशेषतः आयटी शेअर्समध्ये झालेल्या जोरदार खरेदीमुळे बाजाराने मंगळवारच्या घसरणीतून सावरत तेजीसह व्यवहार बंद केला. सलग ५ दिवसांच्या वाढीनंतर काल बाजारात किरकोळ नफावसुली झाली होती. परंतु, आज बाजाराने पुन्हा उत्साह दाखवत मोठी उसळी घेतली. बीएसई सेन्सेक्स ५१३.४५ अंकांच्या (०.६१%) वाढीसह ८५,१८६.४७ च्या विक्रमी पातळीवर बंद झाला. तर, एनएसईचा निफ्टी ५० इंडेक्सही १४२.६० अंकांच्या (०.५५%) तेजीसह २६,०५२.६५ च्या पातळीवर स्थिरावला.
आयटी आणि बँकिंगमध्ये मजबूत खरेदी
आजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील ३० पैकी २० कंपन्यांचे शेअर्स वाढीसह (हिरव्या निशाणीत) बंद झाले, तर निफ्टी ५० मधील ३१ कंपन्यांना फायदा झाला. आयटी क्षेत्रातील कंपनी एचसीएल टेकच्या शेअर्समध्ये सर्वाधिक ४.३२ टक्के वाढ नोंदवण्यात आली. याशिवाय इन्फोसिस ३.७४ टक्के आणि टीसीएस १.९९ टक्के वाढीसह बंद झाले.
याशिवाय बँकिंग क्षेत्रातील स्टॉक्समध्येही चांगली तेजी दिसून आली. एसबीआय १.०२ टक्के, आयसीआयसीआय बँक ०.८२ टक्के आणि कोटक महिंद्रा बँक ०.७० टक्क्यांनी वधारले. एफएमसीजी क्षेत्रातील हिंदुस्थान युनिलिव्हर १.६० टक्के आणि फार्मा क्षेत्रातील सनफार्मा १.३९ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.
टाटा मोटर्स आणि मारुती सुझुकीला नुकसान
एकीकडे तेजी असताना, दुसरीकडे काही निवडक शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसून आला. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक २.७९ टक्के घट झाली. याशिवाय, मारुती सुझुकी १.२८ टक्के, अदानी पोर्ट्स ०.८३ टक्के आणि बजाज फायनान्स ०.६७ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. रिलायन्स इंडस्ट्रीज सारखे मोठे शेअर्सही ०.०७ टक्क्यांच्या किरकोळ नुकसानीसह बंद झाले.
वाचा - शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेचे २,००० रुपये खात्यात जमा! तुमचे नाव येथे तपासा!
एकूणच, आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील खरेदीमुळे बाजारातील सकारात्मक वातावरण कायम राहिले आणि गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला.
