जगभरातील शेअर बाजारात सध्या एक अस्थिरता, अनिश्चितता पाहायला मिळतेय. स्वाभाविकच, भारतीय शेअर बाजारही आव्हानात्मक टप्प्यातून जात आहे. त्याचं ताजं कारण आहे 'टॅरिफ वॉर'. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वेगवेगळ्या देशांसाठी टॅरिफचे वाढीव दर जाहीर केले आहेत. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता आहे, भीती आहे, संभ्रम आहे. शेअर बाजाराची चक्रं कशी, कुठल्या दिशेने फिरतील हे आजघडीला सांगणं कठीण आहे. अशा वेळी गोंधळून किंवा घाबरून न जाता, गुंतवणूकदारांनी संयम बाळगणं अत्यंत आवश्यक आहे. 'सब्र का फल मीठा होता है', या म्हणीचा प्रत्यय याआधीही गुंतवणूकदारांना आला आहे. घसघशीत नफ्याच्या रूपातील गोड फळ अनेकांनी चाखलं आहे. फक्त त्यासाठी तीन ठळक मुद्दे लक्षात घ्यायला हवेत.
दीर्घकालीन दृष्टिकोन महत्त्वाचा
शेअर बाजारात गुंतवणूक करताना अल्पकालीन नफ्याच्या मागे धावण्यापेक्षा दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवणं महत्त्वाचं आहे. बाजारातील अस्थिरता ही कायमस्वरूपी नसते. उदाहरणार्थ, एखाद्या मोठ्या कंपनीच्या शेअर्सची किंमत काही काळासाठी कमी जरी झाली तरी त्या कंपनीच्या फंडामेंटल्सचा अभ्यास करून, ती दीर्घकाळात वाढण्याची शक्यता आहे का, हे पाहणं गरजेचं आहे. संयमाने केलेली गुंतवणूक ही कंपाऊंडिंगच्या तत्त्वावर काम करते. घसरणीच्या काळात तुम्हाला एखाद्या कंपनीचा शेअर कमी किंमतीत मिळू शकतो. परंतु जेव्हा शेअर बाजार पुन्हा वर जाईल तेव्हा तुम्हाला तो शेअर अधिक परतावा देऊ शकतो. उदाहरण पाहायचं झालं तर, २००८ च्या मंदीनंतर किंवा कोरोनाच्या साथीनंतर, जगभरातील शेअर बाजार पुन्हा सावरले आणि संयमी गुंतवणूकदारांना भरघोस परतावा मिळाला.
भावनिक निर्णय टाळणं गरजेचं
बाजारात तेजी असो वा मंदी, भावनिक निर्णय गुंतवणूकदारांचं नुकसानच करतात. घसरणीच्या काळात भीतीनं शेअर्स विकणं किंवा तेजीत लोभापायी चुकीच्या किंमतीत खरेदी करून नुकसान टाळायचं असेल, तर संयम आवश्यक आहे. "The stock market is a device to transfer money from the 'impatient' to the 'patient'", असं दिग्गज गुंतवणूक गुरू वॉरेन बफे म्हणतात. स्वतः बफे यांनी, संयम आणि शिस्तीच्या जोरावरच शेअर बाजारात एवढं प्रचंड यश मिळवलं आहे. त्यांनी मूल्यवान कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आणि बाजारातील तात्कालिक बदलांना बळी न पडता 'लाँग टर्म' यश मिळवलं.
शेअर बाजारातील घसरणीचा फटका म्युच्युअल फंडांनाही बसला आहे. त्यामुळे तिथल्या गुंतवणुकीचं काय करायचं, एसआयपी कायम ठेवायच्या की थांबवायच्या, असे प्रश्नही काही जणांच्या मनात आहेत. मात्र, म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीकडेही लाँग टर्मच्या दृष्टीनेच पाहायला हवं. तरंच, त्यातून चांगला परतावा मिळवता येऊ शकतो.
योग्य संधीची वाट पाहा
संयम बाळगल्यास गुंतवणूकदाराला योग्य संधी ओळखता येते. सध्याच्या बाजारात काही क्षेत्रं जोखमीची असली, तरी संयमानं अभ्यास करून गुंतवणूक केल्यास फायदा होतो. भारतीय शेअर बाजाराच्या सध्याच्या परिस्थितीत संयम हा गुंतवणूकदाराचा सर्वात मोठा मित्रच म्हणायला हवा. शेवटी, गुंतवणूक ही भावनिक नव्हे, तर तार्किक बाब आहे. भावनांवर नियंत्रण ठेवून संयम राखणं हे गुंतवणुकीत यश मिळवण्याचं एक प्रमुख साधन आहे. यासाठी नियमितपणे गुंतवणुकीचा आढावा घेणं, ध्येय ठरवून त्यानुसार पावलं टाकणं आणि बाजाराच्या गोंधळात न पडता शांत राहणं– हेच यशाचं खरं सूत्र आहे.