Hyundai IPO-Stock Price: देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ (IPO) आणणाऱ्या हुंडई मोटर्सची शेअर बाजारातील स्थिती सध्या बिकट आहे. सोमवार, ३० मार्च रोजी कंपनीच्या शेअरमध्ये पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळाली. गेल्या ७ दिवसांपैकी ६ दिवस हुंडई मोटर्सचे शेअर्स घसरले असून, आता हा शेअर १९६० रुपयांच्या इश्यू प्राईजच्याही खाली आला आहे.
बीएससीवर (BSE) कंपनीचा शेअर आज सोमवारी १७९९.८० रुपयांच्या पातळीवर उघडला. व्यवहारादरम्यान ४ टक्क्यांहून अधिक घसरण होऊन शेअरचा भाव १७३६ रुपयांच्या स्तरावर पोहोचला.
आशियातील सर्वात कमकुवत चलन ठरल्यानंतर रुपयाची भरारी; आरबीआयच्या मास्टरस्ट्रोकमुळे १.३% तेजी
गेल्या एक वर्षातील कामगिरी
मार्च महिन्यात कंपनीच्या शेअरच्या किमतीत १९ टक्क्यांची घट झाली आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये लिस्टिंग झाल्यापासून हुंडई मोटर्ससाठी हा आतापर्यंतचा सर्वात खराब महिना ठरला आहे. २०२६ मध्ये आतापर्यंत शेअरचा भाव २३ टक्क्यांनी घसरलाय, तर गेल्या ६ महिन्यांपासून शेअर होल्ड करणाऱ्या गुंतवणूकदारांना ३१ टक्क्यांचं नुकसान सोसावं लागलंय. मात्र, वर्षभराचा विचार केल्यास शेअरच्या किमतीत ३.६७ टक्क्यांची वाढ झाली आहे, तर याच काळात सेन्सेक्स निर्देशांकात ६.४६ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. हुंडई मोटर इंडियानं आतापर्यंत एकदा आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश दिला आहे. २०२५ मध्ये कंपनीने प्रति शेअर २१ रुपयांचा लाभांश दिला होता.
२७,००० कोटी रुपयांचा होता आयपीओ
हुंडई मोटर इंडियाच्या आयपीओचा आकार २७,००० कोटी रुपये होता. हा आयपीओ तीन दिवसांसाठी खुला होता, मात्र तरीही रिटेल कॅटेगरी पूर्णपणे सबस्क्राईब झाली नव्हती.
तज्ज्ञांचं मत काय?
हुंडई मोटर इंडियाचा आरएसआय सध्या २४ आहे, जे हा स्टॉक 'ओव्हरसोल्ड झोन'मध्ये असल्याचं दर्शवतं. सीएनबीसी टीव्ही १८ च्या रिपोर्टनुसार, २९ पैकी २४ तज्ज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिलाय, ३ तज्ज्ञांनी होल्ड करण्याचा तर ५ तज्ज्ञांनी हा ऑटो स्टॉक विकण्याचा सल्ला दिलाय.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
