PF Account Money Withdraw: जर तुम्ही नोकरी करत असाल तर साहजिकच तुमचं पीएफ खातंही असेल. दर महिन्याला तुम्ही आणि तुमच्या कंपनीनं दिलेल्या योगदानाची रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाते. नोकरीत असताना आपल्या पीएफ खात्यात जमा झालेल्या पैशांमधून काही रक्कम काढावी लागते अशी परिस्थिती कधी कधी उद्भवते. पण तुम्हाला माहित आहे का की तुम्ही तुमच्या पीएफच्या रकमेतून कधी आणि किती रक्कम काढू शकता? ईपीएफओनं यासाठी काही नियम निश्चित केले आहेत आणि त्यात काही अटी आहेत, ज्या तुम्ही आधीच समजून घ्यायला हव्यात. यामुळे तुम्हाला आणखी त्रास होणार नाही. त्यासंबंधीच्या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
लग्नासाठी अॅडव्हान्स्ड
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेच्या नियमानुसार आपण लग्नासाठी पैसे काढू शकता. परंतु पीएफ खातेधारक कमीतकमी 7 वर्षे ईपीएफ सदस्य असणं आवश्यक आहे. तसंच त्यांच्या ईपीएफ खात्यात किमान १,००० रुपये असणं आवश्यक आहे. पीएफ खातेधारक ईपीएफमध्ये व्याजासह स्वत:च्या योगदानाच्या ५०% पर्यंत रक्कम काढू शकतात. ईपीएफ अॅडव्हान्सचा वापर आपल्या लग्नासाठी किंवा आपल्या भावंडांच्या किंवा मुलांच्या लग्नासाठी देखील केला जाऊ शकतो.
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
शिक्षणासाठी पैसे काढणं
ईपीएफओच्या नियमांनुसार मुलांच्या शिक्षणासाठी पैसे काढण्याची मुभा आहे. त्यात लग्नासारखेच नियम आहेत. ईपीएफओ सदस्य त्यांच्या आयुष्यात केवळ तीन वेळा पैसे काढू शकतात आणि जास्तीत जास्त पैसे काढण्याची मर्यादा व्याजासह फंडातील त्यांच्या स्वत:च्या योगदानाच्या ५० टक्क्यांपर्यंत आहे. ईपीएफमध्ये किमान ७ वर्षे पूर्ण केलेल्या सदस्यांनाच शिक्षणासाठी ईपीएफ अॅडव्हान्स काढता येईल.
घरासाठी रक्कम काढू शकता
घर खरेदी किंवा बांधण्यासाठी पीएफधारक काही अटींवर ईपीएफचे पैसे काढू शकतात. ईपीएफओच्या नियमानुसार घर/ जमीन खरेदी किंवा घर बांधण्यासाठी सदस्यानं ईपीएफचे सदस्यत्व घेतल्याची किमान पाच वर्षे पूर्ण केलेली असावीत. घराच्या दुरुस्ती किंवा सुधारणांसाठी सदस्य घर पूर्ण झाल्यानंतर पाच वर्षांनंतर पैसे काढू शकतात. अतिरिक्त दुरुस्तीसाठी, एखादी व्यक्ती पहिल्या पैसे काढण्यापासून १० वर्षांनंतर पैसे काढू शकते. ईपीएफ सदस्य यासाठी एकदाच पैसे काढू शकतात.
वैद्यकीय कारणासाठी
वैद्यकीय कारणांमुळे ईपीएफची रक्कम काढण्याच्या अटी लवचिक आहेत. सभासद रुजू झाल्यानंतर लगेचच, केव्हाही पैसे काढू शकतात. ईपीएफ योजना, १९५२ च्या परिच्छेद ६८ जे नुसार, ईपीएफ अॅडव्हान्स आवश्यक तेवढ्या वेळा काढता येतो.
निवृत्तीच्या एक वर्ष आधी
जर एखाद्या सदस्याला निवृत्तीच्या एक वर्ष आधी रक्कम काढायची असेल तर त्याला ईपीएफ योजनेच्या नियमानुसार एक वर्ष आधी एकूण पीएफ फंडाच्या ९०% पर्यंत रक्कम काढण्याची परवानगी आहे आणि सदस्य एकदाच ते करू शकतो.
अपंगत्वासाठी
दिव्यांग सदस्यांसाठी ईपीएफ योजनेच्या नियमानुसार ६ महिन्यांचा मूळ पगार आणि महागाई भत्ता किंवा कर्मचाऱ्यांचं व्याज किंवा उपकरणांची किंमत यापैकी जे कमी असेल ते काढून घेण्यास परवानगी आहे. अपंगत्वामुळे होणारी समस्या कमी करण्यासाठी उपकरणं खरेदी करण्यासाठी सदस्य दर तीन वर्षांनी पैसे काढू शकतात.
बेरोजगारीच्या परिस्थितीत
१५ दिवसांपेक्षा जास्त काळ कंपनी/ संस्था बंद राहिल्यास आणि कर्मचारी कोणत्याही नुकसान भरपाईशिवाय बेरोजगार झाल्यास सदस्य ईपीएफ योजनेच्या नियमानुसार कर्मचाऱ्याचा हिस्सा व्याजासह काढू शकतात. जर एखाद्या कर्मचाऱ्याला सलग दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ पगार मिळाला नसेल तर ते आपल्या वाट्याचं व्याज काढू शकतात.
कर्जाची परतफेड करण्यासाठी
जर पीएफ खातेधारक कमीतकमी १० वर्षे ईपीएफ सदस्य असेल तर ते खरेदी/ बांधकाम किंवा दुरुस्तीसाठी घेतलेल्या कर्जाचे थकित मुद्दल आणि व्याज भरण्यासाठी पैसे काढू शकतात. सदस्यांना ३६ महिन्यांचा मूळ पगार आणि महागाई भत्ता किंवा एकूण व्याजाच्या कर्मचारी आणि नियोक्त्याचा वाटा किंवा एकूण थकित मुद्दल आणि व्याज यापैकी जे कमी असेल ते काढता येतं.