Stock Exchange : तुम्ही जर शेअर बाजारातगुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. देशातील सर्वात जुन्या स्टॉक एक्स्चेंजपैकी एक असलेल्या कलकत्ता स्टॉक एक्सचेंजचा इतिहास आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. सुमारे दशकभर चाललेल्या कायदेशीर लढाईनंतर, CSE यावर्षी २० ऑक्टोबर रोजी आपली शेवटची 'काली पूजा' आणि 'दिवाळी' साजरी करण्याची शक्यता आहे. नियमांचे पालन न केल्यामुळे एप्रिल २०१३ मध्ये बाजार नियामक सेबीने कलकत्ता शेअर बाजारामधील कामकाज स्थगित केले होते.
पुन्हा कामकाज सुरू करण्याच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर आणि न्यायालयातील लढाईनंतर, आता एक्सचेंजने स्वेच्छेने आपले कामकाज बंद करण्याचा आणि स्टॉक एक्स्चेंजचा परवाना सेबीकडे परत करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वेच्छेने माघारीची प्रक्रिया पूर्ण
एक्सचेंजने २५ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत भागधारकांकडून बाजारातून माघार घेण्यासंदर्भात मंजुरी घेतली आहे. यानंतर सीएसईने सेबीकडे माघार घेण्यासाठी अर्ज केला आहे. सेबीने सध्या स्टॉक एक्स्चेंजचे मूल्यांकन करण्यासाठी एका मूल्यांकक एजन्सीची नियुक्ती केली आहे, हे काम अंतिम टप्प्यात आहे. सेबीकडून परवानगी मिळाल्यानंतर CSE एक 'होल्डिंग कंपनी' म्हणून काम करेल. तर, त्याची १००% मालकी असलेली उपकंपनी CCMPL, ही एनएसई आणि बीएसईचे सदस्य म्हणून आपले ब्रोकिंगचे काम सुरू ठेवेल, अशी माहिती सीएसईचे चेअरमन दीपांकर बोस यांनी दिली.
सीएसईचा गौरवशाली आणि वादग्रस्त इतिहास
१९०८ मध्ये स्थापित झालेले हे ११७ वर्षांचे ऐतिहासिक संस्थान एकेकाळी व्यावसायिक उलाढालीच्या बाबतीत बीएसईला टक्कर देत होते आणि कोलकाताच्या आर्थिक वारसाचे ते प्रतीक मानले जात होते. केतन पारेख संबंधित १२० कोटींच्या घोटाळ्यानंतर कलकत्ता स्टॉक एक्स्चेंजमध्ये मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली. अनेक ब्रोकर्स पेमेंटची जबाबदारी पूर्ण करू शकले नाहीत. यामुळे गुंतवणूकदार आणि नियामकांचा विश्वास तुटला, परिणामी ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीमध्ये मोठी घट झाली.
आर्थिक मालमत्तेची विक्री
सेबीने ईएम बायपासवरील सीएसईच्या तीन एकर मालमत्तेला सृजन समूहाला २५३ कोटींमध्ये विकण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. तसेच, एक्स्चेंजने सर्व कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना सुरू केली आहे, ज्यात २०.९५ कोटींचे एकरकमी पेमेंट समाविष्ट आहे. यामुळे कंपनीची वार्षिक सुमारे १० कोटींची बचत होणार आहे.
वाचा - जैन समाजाने दाखवलं एकीचं बळ! एकाचवेळी खरेदी केल्या १८६ लक्झरी कार; प्रत्येक गाडीवर किती डिस्काउंट?
अनुभवी शेअर ब्रोकर सिद्धार्थ थिरानी यांनी याबद्दल बोलताना सांगितले की, "एप्रिल २०१३ मध्ये कामकाज स्थगित होईपर्यंत आम्ही दररोज ट्रेडिंगपूर्वी देवी लक्ष्मीची प्रार्थना करायचो. ही दिवाळी त्या संपूर्ण वारशाला निरोप देण्यासारखी आहे." सीएसईचा शेवट भारतीय भांडवली बाजाराच्या इतिहासातील एका युगाचा अंत म्हणून पाहिला जात आहे.