Heritage Foods Ltd Shares : या वर्षात शेअर बाजारात बरेच चढ-उतार पाहायला मिळाले. पण, काही शेअर्स असेही आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना दमदार परतावा मिळवून दिला. या शेअर्सनी वर्षभर चांगली कामगिरी केली. यातील एक शेअर एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कंपनीचा आहे. हेरिटेज फूड्स लिमिटेड, असे या शेअरचे नाव असून, याने आपल्या गुंतवणूकदारांना एका वर्षात 50 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
हेरिटेज फूड्स लिमिटेडचे मालक कोण आहेत?
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू, हे हेरिटेज फूड्स लिमिटेडचे संस्थापक आहेत. मात्र, सध्या कंपनीची संपूर्ण जबाबदारी भुवनेश्वरी नारा यांच्याकडे आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नी भुवनेश्वरी नारा कंपनीच्या सह-संस्थापक, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. विशेष म्हणजे, चंद्राबाबू देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री देखील आहेत. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) च्या अहवालानुसार, चंद्राबाबू नायडू यांची एकूण संपत्ती 931 कोटी रुपये आहे.
शेअर केले मालामाल
हेरिटेज फूड्स लिमिटेडच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना वर्षभरात मालामाल केले. या शेअरने एका वर्षात 50 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तर 5 वर्षांत 161 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. मंगळवारी(31 डिसेंबर 2024) देखील या शेअरमध्ये वाढ दिसून आली. हेरिटेज फूड्स लिमिटेडचे शेअर्स मंगळवारी 0.30 टक्क्यांच्या वाढीसह 484.15 रुपयांवर व्यवहार करत होते.
निवडणुकीनंतर शेअर रॉकेट बनला
2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी आले. चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या पक्षाला या निवडणुकीत चांगल्या जागा मिळाल्या. याशिवाय राज्यात विधानसभा निवडणुकीतही टीडीपीने एकहाती सत्ता मिळवली. निवडणुकीनंतर चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर कंपनीचे शेअर्स रॉकेट बनले. 23 मे रोजी कंपनीच्या शेअरची किंमत 354.50 रुपये होती, तर 10 जूनपर्यंत हा 695 रुपयांवर पोहोचला.
(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)