HAL Share Price: सरकारी संरक्षण क्षेत्रातील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडनं (HAL) २०२५ या आर्थिक वर्षाचे डिसेंबर तिमाहीचे निकाल बुधवारी जाहीर केले. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीनं निकाल जाहीर करताना, डिसेंबर तिमाहीत त्यांचा नफा वार्षिक आधारावर १४ टक्क्यांनी वाढून १४४० कोटी रुपये झाल्याचं म्हटलं. हा नफा गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत १२६१ कोटी रुपये इतका होता. कंपनीच्या नफ्यात झालेली ही वाढ देशाच्या संरक्षण मंत्रालयाकडून सातत्यानं होत असलेल्या लढाऊ विमानांच्या मागणीमुळे झाली आहे.
गुरुवारी शेअर्समध्ये तेजी
कामकाजादरम्यान, सकाळच्या सत्रात कंपनीचा शेअर २.५८ टक्क्यांच्या तेजीसह ३६८६.७० रुपयांवर पोहोचला होता. दरम्यान, बुधवारी मात्र बुधवारी बाजार बंद झाल्यानंतर हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचा शेअर १.५२ टक्क्यांनी घसरून ३५९४ रुपयांवर बंद झाला. मंगळवारी हा शेअर ३६४९ रुपयांवर बंद झाला होता. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचं (HAL) डिसेंबर तिमाहीत कामकाजातून मिळणारे उत्पन्न १५ टक्क्यांनी वाढून ६,५५७ कोटी रुपयांवर पोहोचलं.
अंतरिम लाभांशाची घोषणा
निकाल जाहीर करण्याबरोबरच हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीनं प्रथमच अंतरिम लाभांश देण्याची घोषणा केली. कंपनीनं प्रति शेअर २५ रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला असून, १८ फेब्रुवारी ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे.
डिसेंबर तिमाहीत एबिटडा १७ टक्क्यांवरून १६८३ कोटी रुपयांवर पोहोचला, तर डिसेंबरमध्ये कंपनीचे ऑपरेटिंग मार्जिन २४.२ टक्क्यांच्या पातळीवर नोंदविण्यात आले आहे. डिसेंबरमध्ये हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला भारत सरकारकडून १२ सुखोई लढाऊ विमानांसाठी १३५०० कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली होती.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)