Oil Stocks : मध्य-पूर्वेतील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतींनी १०० डॉलरचा टप्पा ओलांडलेला असताना, केंद्र सरकारने सर्वसामान्यांना आणि तेल कंपन्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने पेट्रोलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क घटवून ३ रुपये प्रति लिटर केले आहे, तर डिझेलवरील हे शुल्क पूर्णपणे रद्द केले आहे. सरकारच्या या निर्णयाचे पडसाद शुक्रवारी शेअर बाजारात उमटले असून सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांच्या शेअर्समध्ये ४ टक्क्यांपर्यंत तेजी पाहायला मिळाली.
शेअर बाजारात 'इंधन' संचारले!
सरकारच्या घोषणेनंतर ऑईल मार्केटिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली. HPCL, BPCL आणि IOCL या दिग्गज कंपन्यांचे शेअर्स शुक्रवारी व्यवहार सुरू होताच ४ टक्क्यांनी वधारले. कालच खाजगी क्षेत्रातील 'नायरा एनर्जी'ने पेट्रोलमध्ये ५ रुपये आणि डिझेलमध्ये ३ रुपयांची वाढ केली होती. त्यापाठोपाठ सरकारने शुल्क कपातीचा निर्णय घेतल्याने सरकारी कंपन्यांना दरवाढ न करताही आपला नफा टिकवून ठेवण्यास मदत होणार आहे.
कच्च्या तेलाचा 'भडका' कायम
जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर अद्यापही चिंताजनक स्तरावर आहेत. ब्रेंट क्रूड १०७ डॉलर प्रति बॅरल तर WTI क्रूड ९३ डॉलर प्रति बॅरल वर पोहोचले आहे. इतक्या चढ्या किमती असूनही सरकारने टॅक्स कमी केल्यामुळे तेल कंपन्यांची 'अंडर-रिकव्हरी' (तोटा) कमी होण्यास मदत होईल.
वाचा - LPG टंचाईचा फटका; पुण्यात आणि मुंबईत दरांचा मोठा फरक; वाचा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
ऑईल मार्केटिंग कंपन्यांचे अर्थकारण
- गुंतवणूकदारांसाठी या कंपन्यांचे कामकाज समजून घेणे आवश्यक आहे. या कंपन्या मुख्यत्वे 'डाउनस्ट्रीम' क्षेत्रात मोडतात.
- खरेदी : सौदी अरेबिया, रशिया किंवा इराककडून कच्च्या तेलाची खरेदी.
- रिफायनिंग : कच्च्या तेलावर प्रक्रिया करून पेट्रोल, डिझेल आणि एटीएफ तयार करणे.
- GRM : ही या कंपन्यांच्या कमाईची गुरुकिल्ली आहे. एक बॅरल कच्च्या तेलाची किंमत आणि त्यापासून तयार झालेल्या उत्पादनांची विक्री किंमत यातील फरकाला 'जीआरएम' म्हणतात.
- मार्केटिंग मार्जिन : रिफायनिंगनंतर पेट्रोल पंपांपर्यंत इंधन पोहचवताना कंपन्या आपले मार्केटिंग मार्जिन जोडतात.
