भारत आणि अमेरिका यांच्यातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या व्यापार कराराबद्दल (Trade Deal) सकारात्मक संकेत मिळाल्यानंतर, मंगळवार, ११ नोव्हेंबरला कोळंबी आणि टेक्सटाइल कंपन्यांच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ नोंदवली गेली. दोन्ही देशांदरम्यान संभाव्य करारामुळे अमेरिकेच्या बाजारपेठांमध्ये भारतीय निर्यातीवर लावलं जाणारं उच्च शुल्क (टॅरिफ) कमी होऊ शकतात, ज्यामुळे या निर्यात-आधारित (Export-Oriented) क्षेत्रांना मोठा फायदा होईल, अशी गुंतवणूकदारांना आशा आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
सोमवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संकेत दिले की, अमेरिका भारतासोबत लवकरच एका महत्त्वपूर्ण व्यापार कराराच्या अगदी जवळ पोहोचत आहे. हा करार दोन्ही देशांमधील आर्थिक आणि सुरक्षा संबंध मजबूत करेल, अमेरिकेच्या ऊर्जा निर्यातीला चालना देईल आणि मुख्य अमेरिकन क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन देईल, असं ते म्हणाले.
ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये भारतासाठी त्यांचे नवीन राजदूत सर्जिओ गोर यांच्या शपथविधी समारंभात बोलताना सांगितलं, "आम्ही एक करार करत आहोत, फक्त एक फेअर ट्रेड डील. आम्ही भारतासोबत एक करार करत आहोत, जो पूर्वीपेक्षा खूप वेगळा असेल." त्यांनी पुढे म्हटलं, "आम्ही कराराच्या जवळ पोहोचत आहोत." ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर बाजारात उत्साह दिसून आला आणि भारताच्या निर्यात क्षेत्राशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली.
कोळंबी- टेक्सटाइल कंपन्यांचे शेअर्स का वाढले?
ट्रम्प प्रशासनाने काही काळापूर्वी भारतीय आयातीवर ५०% पर्यंत शुल्क वाढवलं होतं, ज्यामुळे कोळंबी आणि टेक्सटाइल कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. भारताने रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणे सुरू ठेवल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता.
परंतु, आता दोन्ही देशांदरम्यान नवीन व्यापार कराराची अपेक्षा वाढल्याने, या शुल्कांमध्ये कपात होईल अशी गुंतवणूकदारांना आशा आहे. यामुळे अमेरिकेच्या बाजारपेठांवर अवलंबून असलेल्या भारतीय निर्यातदारांना मोठा लाभ मिळेल. कोळंबी आणि टेक्सटाइल कंपन्या त्यांच्या एकूण निर्यातीचा मोठा हिस्सा अमेरिकेला पाठवतात. त्यामुळे कोणत्याही शुल्क सवलतीचा थेट फायदा त्यांना होईल.
या शेअर्समध्ये वाढ
भारतातील आघाडीच्या टेक्सटाइल कंपन्यांच्या शेअर्समध्ये मंगळवारी मजबुती दिसून आली. गोकलदास एक्सपोर्ट्सचे शेअर्स जवळपास ५% नी उसळून ₹८७४.८५ प्रति शेअरवर पोहोचले. रेमंड लाईफस्टाईलच्या शेअर्समध्ये सुमारे २% ची वाढ नोंदवली गेली. केपीआर मिलच्या शेअर्समध्येही जवळपास १% ची वाढ दिसून आली.
याव्यतिरिक्त, सीफूड निर्यातदार, विशेषतः कोळंबी उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. एपेक्स फ्रोजन फूड्सचे शेअर्स जवळपास ११% नी उसळून ₹२६९.९० प्रति शेअरवर पोहोचले. अवंती फीड्सच्या शेअर्समध्ये सुमारे ७% ची वाढ नोंदवली गेली.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
