India equity markets : गेल्या वर्षभरापासून भारतीय शेअर बाजार प्रचंड अस्थिर आहे. त्यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. पण, लवकरच ही वाईट वेळ जाणार असल्याचं भाकीक जागतिक कीर्तीच्या बँकेने वर्तवलं आहे. जगातील आघाडीच्या गुंतवणूक बँकांपैकी एक असलेल्या गोल्डमॅन सॅक्सने भारतीय इक्विटी बाजारासाठी मोठी आणि उत्साहवर्धक घोषणा केली आहे. बँकेने भारताचे रेटिंग 'न्यूट्रल'वरून वाढवून 'ओवरवेट' या श्रेणीत अपग्रेड केले आहे. यासोबतच, गोल्डमॅन सॅक्सने निफ्टी ५० इंडेक्ससाठी डिसेंबर २०२६ पर्यंत २९,००० अंशांचा महत्त्वाकांक्षी लक्ष्य निश्चित केला आहे. सध्याच्या पातळीवरून ही सुमारे १४% वाढीची शक्यता आहे.
'न्यूट्रल' वरून 'ओवरवेट' का?
ऑक्टोबर २०२४ मध्ये गोल्डमॅन सॅक्सने भारताला 'न्यूट्रल' रेटिंग दिले होते. त्यावेळी त्यांनी 'महागडे व्हॅल्युएशन्स' आणि 'उत्पन्नातील घट' ही कारणे दिली होती. मात्र, आता 'Leaning In as Growth Revives; Raising India Back to Overweight' या शीर्षकाच्या आपल्या नवीन अहवालात गोल्डमॅन सॅक्सने भारताबद्दलचा विश्वास पुन्हा व्यक्त केला आहे.
वाढीच्या अपग्रेडमागील कारणे
- येत्या काळात भारताच्या विकास गतीमध्ये आणखी बळकटी येईल.
- अनुकूल चलनविषयक आणि राजकोषीय धोरणे.
- कंपन्यांच्या नफ्याच्या अंदाजांमध्ये सुधारणा.
- परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारात परत येण्याची शक्यता.
गेल्या वर्षी भारत पडला होता मागे
गोल्डमॅन सॅक्सच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी उभरत्या बाजारांसाठी हा काळ रेकॉर्डब्रेक ठरला. मात्र, या स्पर्धेत भारत काहीसा मागे राहिला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय शेअर बाजारात या वर्षी केवळ ३% ची वाढ नोंदवली गेली, तर व्यापक उभरत्या बाजार निर्देशांकात सुमारे ३०% ची वाढ झाली. ही गेल्या २० वर्षांतील भारताची सर्वात मोठी 'अंडरपरफॉरमन्स' पैकी एक होती.
व्हॅल्युएशनमध्ये स्थिरता
गोल्डमॅन सॅक्सच्या म्हणण्यानुसार, भारतीय शेअर बाजारातील सध्याची स्थिती महागडे व्हॅल्युएशन आणि कमी नफ्याच्या चिंतेमुळे होती. परंतु आता परिस्थिती बदलत आहे. गेल्या दोन वर्षांत भारताचा प्राइस-टू-अर्निंग्स (P/E) प्रीमियम (जो आशियाई बाजारांपेक्षा ८५-९०% पर्यंत पोहोचला होता) तो आता कमी होऊन ४५% वर आला आहे. हा ४५% चा P/E प्रीमियम २० वर्षांच्या सरासरी ३५% च्या जवळ आहे. इतिहास दर्शवतो की, या स्तरावर भारताने पुढील ६-१२ महिन्यांत आशियाई बाजारांपेक्षा उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
वाचा - ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
नफ्यातील घसरण थांबणे आणि धोरणात्मक समर्थन मिळणे यामुळे आगामी वर्षात भारतीय शेअर बाजार निश्चितच चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा गोल्डमॅन सॅक्सने व्यक्त केली आहे.
