Gold-Silver Price : गेल्या काही आठवड्यांमध्ये देशांतर्गत वायदा बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाल्यामुळे गुंतवणुकदारांचे धाबे दणाणले आहेत. सुमारे तीन आठवड्यांपूर्वी ज्या भावात सोने विक्रमी पातळीवर पोहोचले होते, त्यात आता मोठी कपात झाली आहे. दिवाळीच्या उत्साहाने सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले होते, पण आता चित्र पूर्णपणे बदलले आहे.
मोठी घसरण: आकडे काय सांगतात?
मागील तीन आठवड्यांत सोन्याच्या दरात ८ टक्क्यांहून अधिकची घसरण दिसून आली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, १७ ऑक्टोबर रोजी सोन्याचे दर १,३२,२९४ रुपये प्रति १० ग्रॅम या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले होते. मात्र, ७ नोव्हेंबरपर्यंत हे दर १,२१,०६७ रुपये प्रति १० ग्रॅम इतके खाली आले. याचा अर्थ या कालावधीत सोन्याच्या दरात तब्बल ११,२२७ रुपयांची मोठी घसरण झाली आहे. चांदीचेही भाव त्याच प्रमाणात खाली आले आहेत.
घसरणीमागील कारणे काय?
- अमेरिका आणि चीन यांच्यातील 'टॅरिफ वॉर' शांत झाल्याने आणि दोन्ही देशांमध्ये व्यापार करारावर चर्चा पुढे सरकल्याने, 'सेफ हेवन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोने आणि चांदीची मागणी कमी झाली आहे.
- तज्ज्ञांच्या मते, नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत किंवा अखेरीस भारत आणि अमेरिका यांच्यातही व्यापार करार होण्याची शक्यता आहे.
- भारत-अमेरिका व्यापार करार झाल्यास, रशियावरही युक्रेनसोबत युद्धविरामाची स्थिती स्वीकारण्यासाठी दबाव येऊ शकतो, ज्यामुळे भू-राजकीय तणाव कमी होऊन सोन्याचे भाव आणखी खाली येतील.
- अमेरिकेची मध्यवर्ती बँक डिसेंबरच्या धोरण बैठकीत व्याजदर 'होल्ड'वर ठेवण्याचे संकेत देत आहे. व्याजदरात कोणताही बदल न झाल्यास सोन्या-चांदीच्या किंमतींना आणखी धक्का बसेल.
आणखी घसरण शक्य?
विश्लेषकांचे म्हणणे आहे की, सोन्याच्या किंमतींमध्ये ही सुधारणा पुढील आठवड्यातही कायम राहण्याची शक्यता आहे. आगामी आठवड्यात अनेक महत्त्वाच्या जागतिक घडामोडींवर गुंतवणुकदारांचे लक्ष असेल.
- महागाईचे आकडे
- अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह अधिकाऱ्यांचे धोरणात्मक भाष्य
- चीनचे प्रमुख आर्थिक आकडे
- व्यापार शुल्काबाबत अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी
तज्ज्ञांच्या मते, कमजोर डॉलर आणि भौतिक मागणीतील सुस्तीमुळे सोन्याची वाढ मर्यादित राहिली आहे. किरकोळ ग्राहक किंमती आणखी कमी होण्याची वाट पाहत असल्याने बाजारापासून दूर आहेत. त्यांनी हे देखील नमूद केले की, कमजोर अमेरिकेचा श्रम बाजार अहवाल आणि व्याजदर कपातीच्या अपेक्षांमुळे निकट भविष्यात सोन्याच्या किंमतीला आधार मिळू शकतो आणि सोने पुन्हा तेजीत येण्याची शक्यता आहे.
