सोन्या-चांदीच्या दरात सध्या जोरदार तेजी दिसून येत आहे. सोन्या-चांदीतगुंतवणूक करणाऱ्यांसाठी हे वर्ष अतिशय उत्तम ठरलंय. यावर्षी आतापर्यंत सोन्याच्या किमतीत ६१,७५२ रुपयांची वाढ झाली आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७६,१६२ रुपये होता, जो आता वाढून १,३८,३०० रुपये झाला आहे. तसेच या काळात चांदीच्या दरातही १,४६,०८३ रुपयांची मोठी वाढ झाली आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी एक किलो चांदीची किंमत ८६,०१७ रुपये होती, ती आता २,३८,३०० रुपये प्रतिकिलो झाली आहे.
यंदा देशात सर्वाधिक कमाई कुणी केली?
२०२५ हे वर्ष भारतीय अब्जाधीशांसाठी अत्यंत फायदेशीर ठरले आहे. या वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत ‘रिलायन्स’चे मुकेश अंबानी प्रथम क्रमांकावर आहेत. त्यांच्या संपत्तीत १५.३ अब्ज डॉलर्सची वाढ झाली असून, १०६ अब्ज डॉलर्ससह ते जगातील १८ वे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. ‘स्टील किंग’ लक्ष्मी मित्तल यांनी दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. गौतम अदानी या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
भारतीय गुंतवणूकदारांनी बाजाराला तारलं
२०२५ हे वर्ष दलाल स्ट्रीटसाठी जागतिक गुंतवणूकदारांच्या ऐतिहासिक विक्रीचे वर्ष ठरले. विदेशी गुंतवणूकदारांनी यावर्षी विक्रमी १.५१ लाख कोटी रुपयांचे शेअर्स विकले. मात्र, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (डीआयआय) तब्बल ४.८४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून बाजाराला सावरलं. विशेषतः ‘एसआयपी’च्या माध्यमातून किरकोळ गुंतवणूकदारांनी दाखवलेला विश्वास बाजारासाठी आधारस्तंभ ठरला.
आयपीओंचा महापूर आला, गुंतवणूकदार श्रीमंत
२०२५ मध्ये भारतीय शेअर बाजारात आयपीओंचा महापूर आला असून, ३६५ पेक्षा जास्त कंपन्यांनी १.९५ लाख कोटी रुपयांचा विक्रमी निधी उभारला आहे. यामध्ये मुख्यत्वे १०६ ‘मेनबोर्ड’ कंपन्यांचा वाटा ९४% (१.८३ लाख कोटी) इतका मोठा आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांतील (२०२४ आणि २०२५) ‘आयपीओ’ची एकूण कमाई ही त्याआधीच्या सलग पाच वर्षांच्या कमाईपेक्षाही जास्त आहे.
सर्वांत जास्त विकली गेलेली कार कोणती?
२०२५ मध्ये भारतीय पॅसेंजर व्हेईकल मार्केटमध्ये एसयूव्ही प्रकारातील गाड्यांचे ५५% वर्चस्व असूनही, विक्रीच्या शर्यतीत मारुती सुझुकीची ‘डिझायर’ ही सेडान कार अव्वल ठरली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ दरम्यान १.९५ लाखांहून अधिक युनिट्सच्या विक्रीसह ‘डिझायर’ने पहिला क्रमांक पटकावला. ४१ वर्षांच्या इतिहासात एखाद्या सेडान कारने विक्रीचे शिखर गाठण्याची ही केवळ दुसरीच वेळ आहे.
