Gensol Engineering share price Stock Crash: जेनसोल इंजिनीअरिंगचे शेअर्स बुधवारी ट्रेडिंगदरम्यान चर्चेत होते. कंपनीचा शेअर आजही ५ टक्क्यांच्या लोअर सर्किटवर आला आणि ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर १२३.६५ रुपयांवर पोहोचला. सेबीच्या कारवाईनंतर शेअर्समधील ही घसरण दिसून आली आहे. भारतीय बाजार नियामकानं (सेबी) जेनसोल इंजिनीअरिंग आणि त्याचे प्रवर्तक (अनमोल सिंग जग्गी आणि पुनीत सिंग जग्गी) यांच्यावर निधीचा गैरवापर आणि ऑपरेशनल त्रुटींबद्दल पुढील आदेश येईपर्यंत सिक्युरिटीज मार्केटमधून बंदी घातली आहे. याशिवाय बाजार नियामकानं जेनसोल इंजिनीअरिंग लिमिटेडला जाहीर केलेले शेअर्स स्प्लिट थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. महिनाभरात हा शेअर जवळपास निम्म्यानं तुटला आहे. सलग अनेक सत्रांमध्ये शेअरला लोअर सर्किट लागलं आहे.
काय आहे अधिक माहिती?
नियामकानं अनमोल आणि पुनीत सिंग जग्गी यांना पुढील आदेश येईपर्यंत जेनसोलमध्ये संचालक किंवा प्रमुख व्यवस्थापकीय पदे भूषविण्यास मनाई केली आहे. भारतीय प्रतिभूति आणि विनिमय मंडळाकडे (SEBI) जून २०२४ मध्ये यासंदर्भात तक्रार आली होती. सेबीनं आणखी एका आदेशात तेजी मंडी अॅनालिटिक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या (टीएमएपीएल) कलापी शाह यांच्यावर पीएमएस नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पाच वर्षांची बंदी घातली आहे. पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस नियमांचं उल्लंघन केल्यामुळे ही बंदी घालण्यात आली होती.
शेअर्समध्ये ८५ टक्क्यांची घसरण
या वर्षी आतापर्यंत कंपनीच्या शेअरमध्ये ८५ टक्क्यांची घसरण झाली आहे. या दरम्यान याची किंमत ७७२ रुपयांवरून १२३.६५ रुपयांपर्यंत घसरली आहे. गेल्या महिन्याभरात हा शेअर जवळपास ५० टक्क्यांनी घसरला आहे. या काळात हा शेअर निम्म्याने घसरलाय. गेल्या पाच दिवसांत कंपनीच्या शेअरमध्ये १७ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. वर्षभरात जेनसोलचा शेअर ९२० रुपयांवरून सुमारे ८७ टक्क्यांनी घसरला आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेण आवश्यक आहे.)