Multibagger Stock: गेल्या महिनाभरापासून शेअर बाजारात चढ-उतार सुरू असतानाही काही निवडक शेअर्स गुंतवणूकदारांना दमदार परतावा देत आहेत. अशाच एका मल्टीबॅगर स्टॉकमध्ये GE Power Indiaचे नाव आहे. कंपनीच्या शेअरमध्ये अवघ्या 15 दिवसांत 90 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली गेली आहे. बीएसईवर GE Power Indiaचा शेअर ₹४८० या पातळीवर उघडला आणि दिवसअखेर ९% वाढीसह ₹५२२.१० या स्तरावर पोहोचला. हा कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे.
तिमाही निकालांनी दिला जोरदार पाठिंबा
GE Power Indiaच्या शेअरमधील तेजीत उत्कृष्ट तिमाही निकालांचा मोठा वाटा आहे. कंपनीने जाहीर केलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीतील निव्वळ नफा ₹७२ कोटी होता. तर, मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला ₹१९ कोटींचा तोटाही झाला होता. मात्र, तिमाही-दर-तिमाही निव्वळ नफ्यात १२५% वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्याचे दिसून येते.
महसुलात मोठी वाढ
चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा महसूल (Revenue) ₹३८६ कोटी होता, तर मागील वर्षी याच तिमाहीत ₹३१७ कोटी होता. याशिवाय, EBITDA (डिसेंबर तिमाही) ₹१२५ कोटी, तर मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ₹४ कोटी होता. याशिवाय, EBITDA मार्जिन ९% वरून थेट ३५% झाली. Earnings Per Share (EPS) देखील ४.८१ वरून १०.७६ वर आली. ही आकडेवारी कंपनीच्या ऑपरेशनल सुधारण्यांकडे स्पष्टपणे निर्देश करते.
दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ‘सोन्याचे दिवस’
विशेष म्हणजे, या शेअरने १५ दिवसांत +९०%, एका वर्षात +११२%, तर तीन वर्षांत +३२३% परतावा दिला आहे. या आकड्यांमुळे GE Power India हा खऱ्या अर्थाने मल्टीबॅगर स्टॉक ठरला आहे. एकूणच काय, तर GE Power Indiaने सुधारलेल्या तिमाही निकालांमुळे आणि मजबूत ऑपरेशनल कामगिरीमुळे बाजारात लक्ष वेधून घेतले आहे. अल्पकालीन उसळीबरोबरच दीर्घकालीन परताव्यानेही गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे.
(सूचना: ही बातमी गुंतवणूक सल्ला नाही. शेअर बाजारात गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
