Gautam Adani : उद्योगपती गौतम अदानी यांच्यासाठी महाकुंभात केलेले अन्नदान अत्यंत शुभ ठरत आहे. गुरुवारी त्यांच्या एका कंपनीचा ऑक्टोबर-डिसेंबर तिमाही निकाल जाहीर झाला असून, कंपनीच्या नफ्यात 80 टक्क्यांनी वाढ झाली आहे. नुकतेच गौतम अदानी आपल्या संपूर्ण कुटुंबासह प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी स्वतःच्या हाताने अन्नदान केले.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर-डिसेंबर 2024 या तिमाहीत गौतम अदानी यांच्या अदानी एनर्जी सोल्युशन्सचा एकत्रित निव्वळ नफा सुमारे 80 टक्क्यांनी वाढून 625.30 कोटी रुपये झाला आहे. तर 2023 च्या याच तिमाहीत कंपनीचा नफा 348.25 कोटी रुपये होता. या कालावधीत अदानी एनर्जी सोल्युशन्सचे एकूण उत्पन्न 6,000.39 कोटी रुपये राहिले. तर, मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 4,824.42 कोटी रुपये होते.
महाकुंभात लाखोंना दररोज अन्नदान
कुंभमेळ्यापूर्वीच अदानी परिवाराने कुंभात दरम्यान दररोज 1 लाख लोकांना मोफत भोजन आणि 1 कोटी धार्मिक पुस्तकांचे वाटप करण्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, गौतम अदानी मंगळवारी संपूर्ण कुटुंबासह महाकुंभात पोहोचले होते. यावेळी त्यांची पत्नी प्रीती अदानी, मोठा मुलगा करण अदानी आणि सून परिधी अदानी, नात कावेरी आणि धाकटा मुलगा जीत अदानी यांनी अन्नदान केले.