foreign investors : ऑक्टोबर २०२४ मध्ये भारतीय शेअर बाजारात सुरू झालेली पडझड अजूनही कायम आहे. सप्टेंबरमध्ये ऑल टाईम हायवर असलेला सेन्सेक्स आता नीचांकी पातळीवर घसरला आहे. बाजारात इतकी मोठी घसरण होण्याचं मुख्य कारण म्हणजे परकीय गुंतवणूकदारांची विक्री. परकीय गुंतवणूकदार कोणत्या मनस्थितीत आहेत? हे कोणालाच समजत नाही. अमेरिकेने आयातीवर शुल्क लादल्याचा जागतिक परिणाम झाला आहे. या निर्णयानंतर परकीय गुंतवणूकदारांनी फेब्रुवारीच्या पहिल्या २ आठवड्यात भारतीय शेअर बाजारातून २१,२७२ कोटी रुपये काढले आहेत. यापूर्वी जानेवारीमध्येही ७८,०२७ कोटी रुपयांचे शेअर्स विकले होते. डिपॉझिटरी डेटानुसार, अशा प्रकारे एफपीआयने चालू वर्षात शेअर्समधून सुमारे १ लाख कोटी रुपये काढले आहेत. आता नवीन डेटातून आलेली माहिती भारतीयांची धडधड वाढवणारी आहे.
परकीय गुंतवणूकदारांनी का फिरवली पाठ?
सध्या डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत असल्याने परकीय गुंतवणूकदारांना भारतीय शेअर बाजारात पैस गुंतवणूण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत. शिवाय ट्रम्प परतल्याने अमेरिकेत अनेक संधी उपलब्ध होत आहे. मात्र, तज्ञांच्या मते जेव्हा ही परिस्थिती उलट होईल, म्हणजे डॉलर निर्देशांक खाली जाईल तेव्हा एफपीआयच्या धोरणात उलटसुलट परिणाम होईल. आकडेवारीनुसार, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी या महिन्यात (१४ फेब्रुवारीपर्यंत) आतापर्यंत २१,२७२ कोटी रुपयांचे समभाग विकले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टील आणि ॲल्युमिनियमच्या आयातीवर नवीन शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे. तसेच अनेक देशांवर अधिक शुल्क लादण्याची योजना जाहीर केल्यानंतर बाजारातील चिंता वाढली आहे. या घडामोडींमुळे संभाव्य जागतिक व्यापार युद्धाची भीती पुन्हा जागृत झाली आहे, ज्यामुळे FPI भारतासह उदयोन्मुख बाजारपेठांमधील त्यांचा पैसा काढून घेण्यावर भर देत आहेत.
कमकुवत तिमाही निकालांमुळे परिस्थिती भर
अमेरिकेच्या बदलत्या धोरणांमुळे परकीय गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कमी झाला आहे. याचा परिणाम भारतासारख्या बाजारपेठेतील त्यांच्या गुंतवणूक धोरणांना बदल करण्यास भाग पाडत आहे. दुसरीकडे देशांतर्गत आघाडीवर असलेल्या कंपन्यांचे तिमाही निकाल अपेक्षेपेक्षा कमी आले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची तीव्र घसरण. यामुळे भारतीय मालमत्तेचे आकर्षण कमी झाले आहे. या सर्वांचा परीणाम परकीय गुंतवणूकदारांवर होत आहे. या कालावधीत, त्यांनी सर्वसाधारण मर्यादेच्या अंतर्गत रोख्यांमध्ये १,२९६ कोटी रुपये आणि ऐच्छिक प्रतिधारण मार्गाद्वारे २०६ कोटी रुपये जमा केले आहेत. एकूणच, एफपीआय भारतीय बाजारांबाबत सावध दृष्टिकोन अवलंबत आहेत. गेल्या वर्षी म्हणजे २०२४ मध्ये भारतीय शेअर्समध्ये एफपीआय गुंतवणूक फक्त ४२७ कोटी रुपये होती. यापूर्वी २०२३ मध्ये त्यांनी भारतीय शेअर बाजारात १.७१ लाख कोटी रुपये टाकले होते. त्या तुलनेत, जागतिक मध्यवर्ती बँकांनी आक्रमक धोरण दर वाढीमुळे २०२२ मध्ये एफपीआयने १.२१ लाख कोटी रुपये काढले होते.