Foreign Investors : गेल्या दोन महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता पाहायला मिळत आहे. परकीय गुंतवणूकदार सातत्याने बाजारातून पैसे काढून घेत आहेत. नवीन वर्षात सुरुवात तर दमदार झाली होती. पण, सप्ताह समाप्तीच्या दिवशी सेन्सेक्स पुन्हा आपटला. कंपन्या लवकरच त्यांचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करण्यास सुरुवात करतील. पण, त्याआधी, परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) बाजाराला मोठं खिंडार पाडलं आहे. परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून केवळ ३ ट्रेडिंग सत्रांमध्ये ४,२८५ कोटी रुपये काढले आहेत. डिपॉझिटरी डेटावरून ही माहिती प्राप्त झाली आहे. याआधी संपूर्ण डिसेंबर महिन्यात FPI ने शेअर्समध्ये १५,४४६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.
परकीय गुंतवणूकदारांनी का फिरवली पाठ
जागतिक आणि देशांतर्गत आव्हानांमध्ये परकीय गुंतवणूकदारांची धारणा बदलली आहे. यावर बाजारातील तज्ज्ञांनी सांगितले की, जोपर्यंत अमेरिकन डॉलर मजबूत राहील आणि अमेरिकन बाँडचे उत्पन्न आकर्षक राहील, तोपर्यंत एफपीआयकडून विक्री सुरू राहू शकेल.
गुंतवणूकदार सावध
विदेशी गुंतवणूकदारांनी कंपन्यांच्या तिसऱ्या तिमाही निकालापूर्वी सावध पावलं टाकायला सुरुवात केली आहे. याशिवाय अमेरिकेचे निर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची संभाव्य धोरणे आणि त्याचा जागतिक बाजारांवर होणारा परिणाम यामुळेही गुंतवणूकदार सावध आहेत.
2024 मध्ये ४२७ कोटी रुपयांची गुंतवणूक
यातून परकीय गुंतवणूकदारांचा सावध पवित्रा दिसतो. २०२४ मध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर्समध्ये केवळ ४२७ कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली आहे, तर २०२३ मध्ये FPI ने भारतीय शेअर्समध्ये १.७१ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती आणि २०२२ मध्ये FPI ने २.२१ लाख कोटी रुपयांची विक्री केली होती. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या घसरणीमुळे FPI भावना कमकुवत झाली आहे. याशिवाय, यूएस फेडरल रिझर्व्हकडून यावर्षी व्याजदरात कपात करण्याचे कमी संकेत आहेत, ज्याचा परिणाम दिसून येत आहे.