BSE Share Price: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात अनिश्चिततेचं वातावरण आहे. अनेक दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. दरम्यान, प्रमुख शेअर बाजार बीएसईचा शेअर गुरुवारी ४ टक्क्यांनी वधारून ५८५० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. शेअर्समधील या तेजीमागे एक मोठी बातमी आहे. जागतिक गुंतवणूक कंपनी गोल्डमन सॅक्सनं खुल्या बाजारातील व्यवहारांद्वारे बीएससीतील हिस्सा खरेदी केला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या (NSE) वेबसाइटवर उपलब्ध बल्क डील डेटानुसार, गोल्डमन सॅक्स (सिंगापूर) पीटीईनं बुधवारी खुल्या बाजारातील व्यवहारांद्वारे बीएसई लिमिटेडचे ७.२८ लाख शेअर्स खरेदी केलेत.
गोल्डमन सॅक्सनं बीएसईचे शेअर्स सरासरी ५,५०४.४२ रुपये प्रति शेअर दरानं विकत घेतले आणि एकूण डील व्हॅल्यू ४०१.१९ कोटी रुपये झाली. मात्र, या व्यवहारातील विक्रेत्यांची माहिती तात्काळ मिळू शकली नाही.
स्टॉक्सची स्थिती
हा शेअर ३.८ टक्क्यांनी वधारला आणि ५,८४५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. बुधवारी, २० फेब्रुवारी रोजी मागील सत्रात यात ८.५ टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर ही वाढ झाली. या दोन सत्रात हा शेअर जवळपास १३ टक्क्यांनी वधारला. जानेवारी २०२५ मध्ये ०.४ टक्क्यांनी घसरलेल्या या शेअरमध्ये फेब्रुवारीमध्ये आतापर्यंत १० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. दरम्यान, गेल्या १ वर्षात कंपनीने मल्टीबॅगर परतावा दिलाय, जो १४५ टक्क्यांहून अधिक आहे.
डिसेंबर तिमाही निकाल
बीएसई लिमिटेडचा निव्वळ नफा डिसेंबर २०२४ तिमाहीत दुपटीनं वाढून २२० कोटी रुपयांवर पोहोचलाय, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत ₹१०८.२ कोटी होता. शेअर बाजारानं आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत ८३५.४ कोटी रुपयांचा आतापर्यंतचा सर्वाधिक तिमाही महसूल मिळवलाय, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीतील ४३१.४ कोटी रुपयांच्या तुलनेत ९४ टक्क्यांनी अधिक आहे. आलोच्य तिमाहीत बीएसईची सरासरी दैनंदिन उलाढाल ६,८०० कोटी रुपये होती, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ६,६४३ कोटी रुपयांच्या तुलनेत किंचित अधिक आहे.
(टीप: यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातीज जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)