Share Market FII Sell: भारतीय शेअर बाजार शुक्रवारी चांगलाच हादरला. सेन्सेक्स १४१४ अंकांनी घसरून ७३,१९८ वर, तर निफ्टी निर्देशांक ४२० अंकांनी घसरून २२१२४ च्या पातळीवर बंद झाला. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा (FII) या घसरणीत मोठा वाटा आहे.
शुक्रवारी विक्रमी विक्री
आकडेवारीनुसार, एफआयआयनं शुक्रवारी एकूण ११,६३९ कोटी रुपयांची विक्री केली आहे. शुक्रवारची विक्री ही एफआयआयची फेब्रुवारीतील सर्वात मोठी विक्री आहे. फेब्रुवारी महिन्यात एफआयआयनं एकूण ३४,५७४ कोटी रुपयांची विक्री केली.
फेब्रुवारीत फक्त २ दिवस खरेदी
फेब्रुवारी महिन्यात एकूण २० ट्रेडिंग सेशन होते. त्यापैकी केवळ २ ट्रेडिंग सेशन्स परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी खरेदी केली. १८ फेब्रुवारीला एफआयआयनं ४,७८७ कोटी रुपये आणि ४ फेब्रुवारीला ८०९ कोटी रुपयांची खरेदी केली. याशिवाय उर्वरित सर्व १८ ट्रेडिंग सेशनमध्ये एफआयआयनं विक्री केली.
देशांतर्गत गुंतवणूकदारांचा पाठिंबा
देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) फेब्रुवारीमध्ये १२,३०८.६३ कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्सची खरेदी केली. देशांतर्गत गुंतवणूकदारांची ही खरेदी भारतीय शेअर बाजारातील घसरण थांबविण्यासाठी पुरेशी नाही.
फेब्रुवारी ४ वर्षांतील वाईट महिना
फेब्रुवारी २०२० मध्ये देशभरात कोरोना महामारी शिगेला पोहोचली असताना निफ्टी निर्देशांक ६.४% ने घसरला होता, त्यानंतर निफ्टी निर्देशांकात यावेळी फेब्रुवारी (२०२४) मध्ये ६% घसरण दिसून आली आहे. निफ्टी निर्देशांकानं फेब्रुवारी २०२१ मध्ये ६.६% परतावा दिला, फेब्रुवारी २०२२ मध्ये ३.२% नं घसरला आणि फेब्रुवारी २०२३ मध्ये २% नं घसरला. तर फेब्रुवारी २०२४ मध्ये निफ्टी निर्देशांकानं १.२% परतावा दिला होता.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)