Trump Tariff: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ (आयात शुल्क) धोरण अखेर लागू होणार आहे. २ एप्रिलपासून भारतात हे लागू केलं जाऊ शकतं. कारपासून औषधांपर्यंत याचा व्यापक परिणाम होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावरही पाहायला मिळणार आहे. अनेक क्षेत्राला याचा फटका बसणार असून सोमवारी शेअर बाजारात याचे पडसाद पाहायला मिळू शकतात.
ऑटो ते फार्मा सेक्टर फोकसमध्ये
डोनाल्ड ट्रम्प बऱ्याच काळापासून भारताला टॅरिफ किंग म्हणत आहेत. अलीकडेच त्यांनी भारतावर परस्पर शुल्क लादण्याची घोषणा केली होती, ज्यासाठी २ एप्रिल ही तारीख निश्चित करण्यात आली होती, जी तोंडावर आली आहे. टॅरिफचा परिणाम देशाच्या ३१ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीवर दिसू शकतो. कार-ऑटो पार्ट्ससह, फार्मास्युटिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि दागिने क्षेत्र यावर सर्वाधिक परिणाम होणार आहे. बिझनेस टुडेच्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये भारताची अमेरिकेला एकूण निर्यात ७७.५ अब्ज डॉलर होती, तर अमेरिकेची भारतातील निर्यात ४०.७ अब्ज डॉलर होती. अमेरिका हा भारतातील तिसरा सर्वात मोठा गुंतवणूकदार आहे, ज्याने २००० पासून एकूण ६७.७६ अब्ज डॉलर एफडीआय केले आहे.
फार्मा सेक्टरला धक्का बसू शकतो
टॅरिफचा सर्वाधिक फटका फार्मा क्षेत्राला बसू शकतो. यूएस सध्या फार्मा आयातीवर किमान शुल्क लावते. परंतु, जर आपण भारताबद्दल बोललो तर अमेरिकन फार्मा उत्पादनांवर १०% शुल्क लागू करतो. जर अमेरिकेने यावर परस्पर शुल्क लादले तर फार्मा क्षेत्राला याचा फटका बसेल. वितरक आणि जेनेरिक उत्पादकांना अतिरिक्त खर्चाचा बोजा उचलणे कठीण जाईल, अशी चिंता उद्योग समूहांनी व्यक्त केली आहे. सन फार्मा, सिप्ला, ल्युपिन आणि डॉ रेड्डीज लॅब या कंपन्यांवर परिणाम होऊ शकतो, असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
ज्वेलरी क्षेत्रातील शेअर्सवरही परिणाम होणार
इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात डिक्सन टेक्नॉलॉजीज आणि केनेस टेक या कंपन्यांच्या शेअर्सवर परिणाम होऊ शकतो, तर ज्वेलरी क्षेत्रात मलाबार गोल्ड, रेनेन्सा ज्वेलरी, राजेश एक्सपोर्ट्स आणि कल्याण ज्वेलर्ससह अनेक भारतीय कंपन्या यूएस मार्केटमध्ये वाढत आहे. परस्पर शुल्कामुळे (रेसिप्रोकल टॅरिफ) त्यांच्या शेअर्सवर परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर आयटी क्षेत्राबाबतही सावध राहण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. ते म्हणतात की जर व्यापार तणाव वाढला आणि अमेरिकेत ग्राहक खर्च कमी झाला तर इन्फोसिस आणि टीसीएस सारख्या कंपन्यांच्या आर्थिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
भारत टॅरिफ रोखण्यास यशस्वी होईल?
ट्रम्प टॅरिफ रोखण्यासाठी भारत सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. यापूर्वी अॅमेझॉन, गुगल सारख्या अमेरिकन कंपन्यांवरील समानीकरण शुल्क भारत सरकारने माफ केला. यामुळे कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडणार आहे. यापलीकडेही टॅरिफ लागू करू नये यासाठी आणखी काही ठिकाणी आयात शुल्क लागू कमी करण्याची तयारी सरकारने दर्शवली आहे. त्यामुळे ट्रम्प टॅरिफ लागू होतो की थांबवला जाईल, हे २ एप्रिल रोजी स्पष्ट होईल.
(Disclaimer- यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)