Coal India unit CMPDIL IPO:शेअर बाजारातगुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. तुम्हाला सरकारी कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावायचे असतील, तर ही संधी तुमच्यासाठीच आहे. सरकारी कंपनी कोल इंडियाची शाखा असलेल्या सेंट्रल माइन प्लॅनिंग अँड डिझाईन इन्स्टिट्यूट लिमिटेड (CMPDIL) चा IPO लॉन्च होणार आहे. या आयपीओद्वारे निधी उभारण्यासाठी कंपनीने भांडवली बाजार नियामक सेबीकडे एक मसुदा दाखल केला. मसुद्यानुसार, कोल इंडिया 7.14 कोटी शेअर्स विकण्याची योजना आखत आहे.
हा इशू पूर्णपणे ऑफर फॉर सेल अंतर्गत असेल. यामध्ये CMPDIL कोणतेही नवीन शेअर्स जारी करणार नाही. एसबीआय कॅपिटल मार्केट्स आणि आयडीबीआय कॅपिटल मार्केट्स अँड सिक्युरिटीज हे आयपीओचे बुक-रनिंग लीड मॅनेजर आहेत.
कोल इंडियाने दिले संकेत
अलीकडेच, एका निवेदनात कोल इंडियाने आयपीओबद्दल संकेत दिले होते. त्यानुसार, सीएमपीडीआयएल आणि भारत कोकिंग कोल लिमिटेड (बीसीसीएल) च्या सूचीकरणाशी संबंधित कामे प्रगतीपथावर आहेत. कोल इंडियाने अद्याप बीसीसीएलसाठी सार्वजनिकरित्या कागदपत्रे दाखल केलेली नाहीत. कोळसा मंत्रालयाने यापूर्वी सांगितले होते की, बीसीसीएल आणि सीएमपीडी या दोघांचीही लिस्टिंग होईल, परंतु वेळ बाजाराच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.
कोळसा उत्पादनात कोल इंडियाचे वर्चस्व
भारतातील सुमारे 80 टक्के कोळशाचे उत्पादन करणारी कोल इंडिया लिमिटेड देशांतर्गत विस्तारासोबतच दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका यासारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये खनिज प्रकल्पांचा सक्रियपणे शोध घेत आहे. कंपनी तीन कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्पांवर काम करत आहे, ज्यात ओडिशामध्ये 16,000 कोटी रुपये खर्चाचा 1600 मेगावॅट क्षमतेचा पिटहेड पॉवर प्रकल्प समाविष्ट आहे. याशिवाय, दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनसोबत संयुक्तपणे असाच एक प्रकल्प राबवत आहे. 2025 या आर्थिक वर्षासाठी कंपनीचे भांडवली खर्चाचे लक्ष्य 17 हजार कोटी रुपये ठेवण्यात आले आहे.
(टीप- शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)