Citichem India IPO Listing: सिटीकेम इंडिया लिमिटेडचा आयपीओ आज शेअर बाजारात लिस्ट झाला. कंपनीच्या शेअर्सचं फ्लॅट लिस्टिंग झालं. सिटीकेम इंडिया लिमिटेडचा शेअर ७० रुपयांच्या किमतीच्या तुलनेत ७० रुपयांवरच लिस्ट झाला. फ्लॅट लिस्टिंगनंतर हा शेअर विक्रीसाठी रांग लागली आणि तो ५ टक्क्यांच्या लोअर सर्किटवर पोहोचला. त्यामुळे हा शेअर इंट्राडे नीचांकी ६६.५० रुपयांच्या पातळीवर आला.
मुंबईतील सिटीकेम इंडियाचा आयपीओ २७ डिसेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान गुंतवणूकीसाठी खुला होता. २ हजार इक्विटी शेअर्सच्या लॉट साईजसह त्याची किंमत ७० रुपये प्रति शेअर होती. कंपनीनं आयपीओच्या माध्यमातून एकूण १२.६० कोटी रुपये उभे केले, जे पूर्णपणे १८ लाख नव्या इक्विटी शेअर्सची विक्री होती. या इश्यूला एकूण ४१४.३५ पट सब्सक्राइब करण्यात आलं आणि सुमारे ५,००० कोटी रुपयांची बोली लावण्यात आली. त्यात ३ लाखांहून अधिक अर्ज मिळाले. नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा (NII) हिस्सा २७७.८८ पट सब्सक्राइब झाला. तीन दिवसांत किरकोळ गुंतवणूकदारांनी यात ५४३.१८ पट बोली लावली.
कंपनीबाबत अधिक माहिती?
१९९२ मध्ये स्थापन झालेली सिटीकेम इंडिया फार्मास्युटिकल उद्योगासाठी ऑर्गेनिक आणि इनऑर्गेनिक केमिकल्स, बल्क औषधं आणि फूड केमिकल्स खरेदी आणि पुरवठा करण्यासाठी सक्रिय आहे. कंपनी स्पेशालिटी केमिकल्स, बल्क मेडिसिन आणि इंटरमीडिएट प्रॉडक्ट्सच्या थेट पुरवठ्यावर लक्ष केंद्रित करते. ३० जून २०२४ पर्यंत कंपनीत ९ कर्मचारी होते.
होरायझन मॅनेजमेंट सिटीकेम इंडिया आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर आहे, तर केएफआयएन टेक्नॉलॉजीज इश्यूचे रजिस्ट्रार आहे. सिटीकेम इंडियाच्या आयपीओची मार्केट मेकर आफ्टरट्रेड ब्रोकिंग आहे. कंपनीचे बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर लिस्ट करण्यात आलेत.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)