Stock Market : बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी संपले आणि आता सर्वांचे लक्ष १४ नोव्हेंबरला लागणाऱ्या निकालांकडे लागले आहे. दरम्यान, जाहीर झालेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजप-जेडीयूच्या एनडीए सरकारची सत्ता कायम राहण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. याच निकालांचा परिणाम म्हणून आज (बुधवारी) भारतीय शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आली. पण, जर एनडीए पराभूत झाली तर निफ्टी ७ टक्केंपर्यंत घसरू शकते असा इशारा ब्रोकरेज फर्मने दिला आहे.
सेन्सेक्स आज ६०० अंशांहून अधिक वाढून ८४,५०० च्या पुढे पोहोचला, तर निफ्टी देखील २५,९०० च्या जवळ ट्रेड करत होता. ही बाजारातील तेजी गुंतवणूकदार राजकीय स्थैर्याची अपेक्षा करत असल्याचे स्पष्टपणे दर्शवत आहे.
NDA हरल्यास निफ्टी ७% कोसळू शकतो!
एक्झिट पोल समोर येण्यापूर्वी बाजारात मात्र वेगळीच भीती होती. ब्रोकरेज फर्म इन्क्रेड इक्विटीजने यापूर्वीच एक गंभीर इशारा दिला होता. जर भाजप-जेडीयूचे एनडीए सरकार सत्तेवर आले नाही आणि नितीश कुमार किंवा चंद्राबाबू नायडू यांच्यासारख्या प्रादेशिक नेत्यांच्या नेतृत्वाखाली नवीन आघाडी तयार झाली, तर निफ्टीमध्ये ५ ते ७ टक्क्यांची मोठी आणि तात्काळ घसरण होऊ शकते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरही शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती आणि निफ्टी ५० इंडेक्स इंट्रा-डेमध्ये ६ टक्क्यांपर्यंत खाली आला होता.
अस्थिरता आणि धोरणात्मक अनिश्चितता
इनक्रेड रिसर्चचे प्रत्युष कमल यांच्या मते, एक्झिट पोलच्या निकालामुळे बाजाराची अस्थिरता कमी झाली आहे. "जर आघाडी अस्पष्ट राहिली असती, तर याचा अर्थ धोरणात्मक अनिश्चितता, अर्थसंकल्पात शिथिलता आणि गुंतवणूकदारांकडून जोखीम टाळणे असा झाला असता. परदेशी गुंतवणूक बाहेर जाणे, बॉन्ड यील्डमध्ये वाढ आणि रुपयावर दबाव, हे सर्व अस्थिरतेचे संकेत होते."
स्थिर सरकारमुळे बाजाराला 'विश्वास'
बोनान्झा रिसर्चचे अभिनव तिवारी यांचे मत आहे की, एनडीएच्या विजयाची शक्यता गुंतवणूकदारांनी आधीच विचारात घेतली आहे. विधानसभेच्या निकालांपेक्षा बाजार जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक ट्रेंडवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. अभिनव तिवारी यांनी स्पष्ट केले की, स्थिर सरकारचा अर्थ धोरणांमध्ये सातत्य, पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती आणि सार्वजनिक खर्चात स्थिरता असा आहे. याच गोष्टी बाजाराला सर्वाधिक पसंत आहेत. जरी नवीन आघाडी सत्तेत आली, तरी त्यांनी पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक, मॅक्रो स्थिरता आणि अर्थसंकल्पीय शिस्त असलेला विश्वासार्ह आर्थिक अजेंडा त्वरित सादर केल्यास बाजार लवकर सावरू शकतो.
वाचा - एका गॅरेजमधून सुरुवात! आज स्वित्झर्लंडमध्ये २००० टन सोने शुद्ध करणारी कंपनी; ६० देशांमध्ये व्यवसाय
सध्या तरी, एनडीएला बहुमत मिळण्याच्या स्पष्ट संकेत मिळाल्याने बाजारात सकारात्मक वातावरण दिसून येत आहे.
