Borosil Renewables Share Price : सोलर ग्लास आणि व्हॅल्यू अॅडेड सोलर प्रॉडक्ट्स बनवणाऱ्या बोरोसिल रिन्युएबल्स या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी आली आहे. बुधवारी बीएसईवर बोरोसिल रिन्युएबल्सचा शेअर ५ टक्क्यांच्या अपर सर्किटनंतर ५७३.५५ रुपयांवर पोहोचला. सलग दुसऱ्या दिवशी कंपनीच्या शेअर्सना अपर सर्किट लागलं.
बोरोसिल रिन्युएबल्सच्या प्रवर्तकानं नुकताच कंपनीतील आपला हिस्सा वाढवला असून त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी पाहायला मिळत आहे. कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांतील उच्चांक ६६७.४० रुपये आहे. तर बोरोसिल रिन्युएबल्सच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ४०३.१० रुपये आहे.
९६ हजार शेअर्स खरेदी केले
बोरोसिल रिन्युएबल्सचे प्रवर्तक किरण खेरुका यांनी ६ जानेवारी २०२५ रोजी कंपनीचे ९६ हजार शेअर्स खरेदी केले आहेत. त्यांनी हे शेअर्स खुल्या बाजारातील व्यवहारातून खरेदी केले असून ते ०.०७ टक्के हिस्स्याइतके आहे. या व्यवहाराची किंमत ५.४ कोटी रुपये आहे. ९६ हजार शेअर्स खरेदी केल्यानंतर किरण खेरुका यांचा कंपनीतील हिस्सा ३.५७ टक्क्यांवरून ३.६४ टक्क्यांवर पोहोचला. कंपनीतील प्रवर्तकाचा हिस्सा वाढविणं हे सकारात्मक लक्षण मानलं जातं.
५ वर्षांत २४६ टक्क्यांची वाढ
गेल्या पाच वर्षांत बोरोसिल रिन्युएबल्सच्या शेअरमध्ये २४६ टक्के वाढ झाली आहे. १० जानेवारी २०२० रोजी सोलर कंपनीचा शेअर १६५.६५ रुपयांवर होता. बोरोसिल रिन्युएबल्सचा शेअर ८ जानेवारी २०२५ रोजी ५७३.५५ रुपयांवर पोहोचला. गेल्या १० वर्षांत बोरोसिल रिन्युएबल्सचे शेअर्स २२२१ टक्क्यांनी वधारले आहेत. या काळात कंपनीचे शेअर्स २४.७२ रुपयांवरून ५७३ रुपयांवर पोहोचले. गेल्या वर्षभरात सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये २३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकाची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)