BoAt IPO : स्मार्टफोन ॲक्सेसरीज आणि ऑडिओ उत्पादनांसाठी प्रसिद्ध असलेली कंपनी BoAt पुन्हा एकदा आपला बहुप्रतिक्षित आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. मात्र, कंपनीने अलीकडेच दाखल केलेल्या प्राथमिक नोंदणी दस्तऐवजमधून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे, ज्यामुळे कंपनीच्या अडचणी वाढू शकतात. ऑडिटर्सनी बोट आणि तिच्या उपकंपन्यांच्या कामकाजात अनेक गंभीर अनियमितता आणि नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आणले आहे.
ऑडिटर्सनी सांगितलेल्या प्रमुख त्रुटी
- ऑडिटर्स बीएसआर अँड कंपनी एलएलपी या ऑडिटर्सच्या अहवालानुसार, बोट कंपनीच्या कारभारात काही प्रमुख त्रुटी आणि नियमांचे उल्लंघन आढळले.
- कंपनीने बँकांना पाठवलेले त्रैमासिक वित्तीय अहवाल हे कंपनीचे FY23, FY24 आणि FY25 मधील अंतिम खात्यांशी जुळत नव्हते.
- कंपनीने अल्प मुदतीचे कर्ज उपकंपन्यांच्या दीर्घकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी वापरले, जे नियमांनुसार चुकीचे आहे.
- अनेक ठिकाणी कंपनीचे अंतर्गत वित्तीय नियंत्रण अत्यंत ढिले आढळले.
- वैधानिक देयके योग्य वेळी भरली नाहीत, रेकॉर्डचा योग्य बॅकअप ठेवला नाही आणि अनिवार्य ऑडिट-ट्रेल सिस्टीम आढळली नाही.
- FY23 मध्ये कंपनीच्या संचालकांना दिलेले वेतन-भत्ते कंपनी कायद्याने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त होते. (नंतर भागधारकांच्या मंजुरीने ही त्रुटी सुधारण्यात आली).
- प्लांट आणि उपकरणांची भौतिक पडताळणी देखील व्यवस्थित करण्यात आली नव्हती.
कंपनीचा दावा आणि IPO वर परिणाम
बोटने ऑडिटर्सनी उपस्थित केलेल्या समस्या दूर करण्यासाठी डेटा जुळवणे, नवीन अकाउंटिंग सिस्टीम लागू करणे आणि आवश्यक मंजुरी घेणे यांसारखी पाऊले उचलल्याचा दावा केला आहे. मात्र, ऑडिटर्सचे म्हणणे आहे की भविष्यात अशी समस्या पुन्हा होणार नाही याची कोणतीही हमी नाही आणि कंपनीला आपल्या अंतर्गत प्रक्रिया अधिक मजबूत करण्याची गरज आहे.
IPO वर काय परिणाम होईल?
बोटच्या १,५०० कोटी रुपयांच्या IPO प्रस्तावाशी हे खुलासे जोडलेले आहेत. या IPO मध्ये ५०० कोटीचे नवीन शेअर्स जारी केले जातील, तर १,००० कोटीचे शेअर्स सध्याचे गुंतवणूकदार ऑफर-फॉर-सेलद्वारे विकतील. गुंतवणूकदार आता कंपनीच्या ब्रँडची ताकद आणि वेगाने वाढणारा व्यवसाय या ऑडिट निष्कर्षांच्या पार्श्वभूमीवर पाहतील. या अहवालांनी कंपनीच्या प्रशासन प्रणालीची खरी स्थिती समोर आणली आहे.
आयपीओ आणण्यापूर्वी, बोटला या गंभीर त्रुटी दूर करण्यासाठी कंपनी गंभीर आहे. तिच्या अंतर्गत प्रक्रिया मजबूत करत आहे, असा विश्वास गुंतवणूकदारांना द्यावा लागेल. तसे न झाल्यास, आयपीओवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
वाचा - पुढील वर्षात १ तोळा सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार? ब्रोकरेज फर्मने सांगितला मोठा आकडा
आयपीओचा आकार कमी झाला
बोटने यापूर्वी २,००० कोटींचा आयपीओ आणण्याची योजना आखली होती. परंतु, आता तो आकार १,५०० कोटी रुपयांपर्यंत कमी करण्यात आला आहे. दोन वर्षे तोट्यात राहिल्यानंतर कंपनी नुकतीच नफ्यात परतली आहे, पण वेयरेबल मार्केटमधील वाढलेल्या प्राइस वॉरमुळे कंपनीवर दबाव कायम आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
