Blackstone Kolte-Patil Deal: ब्लॅकस्टोन या जगातील आघाडीच्या गुंतवणूक कंपनीनं भारतीय रिअल इस्टेट कंपनी कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेडमध्ये (Kolte-Patil Developers) ४० टक्के हिस्सा खरेदी केलाय. एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, हा व्यवहार ११६७.०३ कोटी रुपयांमध्ये झाला. या व्यवहारानंतर ब्लॅकस्टोनकडे आता ओपन ऑफरद्वारे विद्यमान प्रवर्तक भागधारकांकडून शेअर्स खरेदी करण्याचा पर्याय आहे.
बीएसईला दिलेल्या माहितीनुसार, रियल्टी कंपनी ब्लॅकस्टोनला १४.२९ टक्के प्रिफरेंशियल शेअर्स विकणार आहे. त्यासाठी एकूण ४१७.०३ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. या करारामुळे १.२६ कोटी शेअर्स ट्रान्सफर होतील.
कंपनीचं नियंत्रण ब्लॅकस्टोनकडे
कोलते-पाटील डेव्हलपर्सचे (Kolte-Patil Developers) विद्यमान भागधारक २५.७१ टक्के हिस्सा विकत आहेत. त्यासाठी त्यांना ७५० कोटी रुपये मिळतील. या करारानुसार अमेरिकन कंपनीला २.२७ दशलक्ष शेअर्स मिळणार आहेत. दोन्ही व्यवहार एकत्र केल्यास एकूण ११६७.०३ कोटी रुपये जमा होतील. त्या बदल्यात ब्लॅकस्टोनला २.२७ कोटी शेअर्स दिले जातील. ब्लॅकस्टोन हा हिस्सा बीआरईपी एशिया थ्री इंडिया होल्डिंग कंपनी ७ पीटीईच्या माध्यमातून विकत घेत आहे. हा करार पूर्ण झाल्यानंतर अमेरिकन इन्व्हेस्टमेंट कंपनीचा ६६ टक्के हिस्सा राहणार आहे. ज्यामुळे कंपनीचे नियंत्रण ब्लॅकस्टोनकडे जाईल. एक्स्चेंजला मिळालेल्या माहितीनुसार, राजेश अनिरुद्ध पाटील, नरेश अनिरुद्ध पाटील आणि मिलिंद दिगंबर हे प्रवर्तक आपला हिस्सा विकत आहेत.
शेअर्सची कामगिरी कशी?
गुरुवारी कंपनीचा शेअर २ टक्क्यांहून अधिक वाढून ३४७.१५ रुपयांवर होता. गेल्या २ आठवड्यात कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत जवळपास ४० टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र, त्यानंतरही वर्षभर शेअर ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांचा परतावा नकारात्मकच आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)