Stock Market Sensex :शेअर बाजाराची स्थिती सध्या "कभी खुशी कभी गम" चित्रपटासारखी झाली आहे. मंगळवरी अस्वालाने पंजा मारल्यानंतर गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. मात्र, लगेचच दुसऱ्या दिवशी बाजारात मोठी रिकव्हरी पाहायला मिळाली. आज बाजाराने अवघ्या १० मिनिटांत कालची सगळी कसर भरुन काढली. मोठ्या रिकव्हरीनंतर दिवसाच्या उच्च पातळीच्या जवळ बाजार बंद झाला आहे. वास्तविक, बाजारातील तज्ज्ञ या रिकव्हरीमुळे विशेष प्रभावित झाले नाही. त्यांच्या मते, बाजारात आत्मविश्वास निर्माण करू शकेल, असं सध्या तरी काही दिसत नाही.
कशी होती बाजाराची स्थिती?
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्षपदी बसल्यानंतर परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केली. मात्र, दिवसभरात प्रचंड चढ-उतारानंतर शेअर बाजार अखेरीस सावरला. बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही प्रमुख निर्देशांक चांगल्या मजबूतीसह बंद झाले. BSE सेन्सेक्स ५६६.६३ अंकांनी उसळी घेत ७६,४०४.९९ वर बंद झाला. त्याचप्रमाणे NSE निफ्टी १३०.७० अंकांनी वाढून २३,१५५.५ अंकांवर पोहोचला.
आयटी आणि बँकिंग शेअर्सने सावरलं
आयटी आणि बँकिंग शेअर्सने आज बाजाराला आधार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सेन्सेक्समध्ये लिस्टेड ३० कंपन्यांपैकी इन्फोसिस, सन फार्मास्युटिकल, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, आयटीसी, टायटन, टेक महिंद्रा, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल आणि बजाज फायनान्स यांचे शेअर्स वधारले. मात्र, दुसरीकडे आजही मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागांना चांगलाच फटका बसला. व्यापारादरम्यान एकवेळ मिड कॅप निर्देशांक १५०० अंकांनी घसरला होता. पण नंतर त्यात सुधारणा झाली. बाजार बंद असताना मिडकॅप निर्देशांक ५१६.१९ अंकांनी घसरला.
परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री
जागतिक बाजारातील संमिश्र ट्रेंडमध्ये बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टी हिरव्या चिन्हासह उघडले. आशियाई बाजारात जपानचा निक्की आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी नफ्यात तर चीनचा शांघाय कंपोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग तोट्यात होता. मंगळवारी अमेरिकन बाजार सकारात्मक पातळीवर बंद झाले. आंतरराष्ट्रीय मानक ब्रेंट क्रूड ०.०६ टक्क्यांनी वाढून ७९.३४ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदार (FII) मंगळवारी विक्री करणारे होते. त्यांनी ५,९२०.२८ कोटी रुपयांचे शेअर्स विकले.