Upcoming IPO 2025: देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) आपल्या आणखी एका सहाय्यक कंपनीला स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी म्हणजे एसबीआय फंड्स मॅनेजमेंट लिमिटेड, जी एसबीआय म्युच्युअल फंडाचे संचालन करते.
बँकेनं या कंपनीमधील ६.३ टक्के भागीदारी विकण्याचा निर्णय घेतलाय. ही विक्री आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) द्वारे केली जाईल. या माध्यमातून बँकेला हजारो कोटी रुपयांची मोठी रक्कम उभी करण्यास मदत मिळणार आहे. सूत्रांनुसार, ही डील ७,००० ते ८,००० कोटी रुपये एवढ्या मूल्यांकनावर होण्याची शक्यता आहे.
२२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
३ कोटींहून अधिक समभाग विक्रीची तयारी
६ नोव्हेंबर रोजी एसबीआयच्या एक्झिक्युटिव कमिटी ऑफ सेंट्रल बोर्डच्या बैठकीत या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाला. बँकेनं मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, बँक एकूण ३ कोटी २० लाख ६० हजार इक्विटी शेअर्स विकणार आहे. हे समभाग कंपनीच्या एकूण भागभांडवलाच्या नेमके ६.३००७ टक्के आहेत. परंतु, हे सर्व नियामक मंजुरी मिळाल्यानंतरच होईल.
एसबीआय फंड्स मॅनेजमेंट ही भारतातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंड व्यवस्थापन कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी एसबीआय म्युच्युअल फंड चालवते आणि एक संयुक्त उपक्रम (जॉइंट वेंचर) आहे. यामध्ये एकीकडे एसबीआयचा ६३ टक्के हिस्सा आहे, तर दुसरीकडे फ्रान्सची अमुंडी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी भागीदार आहे, जिच्याकडे उर्वरित ३७ टक्के हिस्सा आहे.
मार्च २०२५ च्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस या फंडाचे ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट (एयूएम) ८.५ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक होते. कंपनीकडे ८० लाखांहून अधिक सक्रिय गुंतवणूकदार असून २५० हून अधिक फंड योजना सध्या सुरू आहेत. गुंतवणूकदार आधार आणि योजना मूल्य या दोन्हीमध्ये ही कंपनी आघाडीवर आहे.
आयपीओमुळे एसबीआयला काय फायदा?
विश्लेषकांचं मत आहे की या आयपीओमुळे बँकेची कॅपिटल बफर क्षमता (Capital Buffer Strength) वाढेल. म्हणजेच बँकेचा भांडवली आधार अधिक मजबूत होईल. यामुळे आगामी काळात बँकेचं मूल्यांकन आणि गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक वाढेल. एसबीआयनं अद्याप आयपीओचा आकार किंवा मूल्यांकनाची माहिती जाहीर केली नसली तरी, हा भारतातील ॲसेट मॅनेजमेंट उद्योगातील सर्वात मोठा आयपीओ ठरू शकतो.
सर्वप्रथम, आयपीओचा ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) सेबी आणि स्टॉक एक्सचेंजमध्ये जमा केला जाईल. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, सर्व आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर ही लिस्टिंग २०२६ च्या पहिल्या सहामाहीत होण्याची शक्यता आहे.
एसबीआय समूहासाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे आहे. बँकेने यापूर्वीही एसबीआय लाइफ इन्शुरन्स, एसबीआय कार्ड्स आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स यांसारख्या आपल्या अनेक सहाय्यक कंपन्यांमधील हिस्सा विकून बाजारातून मोठी रक्कम जमा केली आहे. हे सर्व "व्हॅल्यू अनलॉक" करण्याच्या धोरणाचा भाग आहे, ज्याचा अर्थ आपल्या मालमत्तेचे योग्य मूल्य बाजारात आणून त्याचा फायदा घेणं. हा आयपीओ केवळ एसबीआयसाठी नव्हे, तर संपूर्ण म्युच्युअल फंड क्षेत्रासाठी एक मोठी संधी आहे. लहान-मोठे गुंतवणूकदार या आयपीओवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
