Warren Buffett : तुम्ही जर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल वॉरेन बफेट हे नाव कधी ना कधी नक्कीच ऐकलं असेल. वॉरेन बफेट यांनी आपली ९० टक्क्यांपेक्षा जास्त संपत्ती ही शेअर बाजारातील गुंतवणुकीतून कमावली आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून वॉरेन बफेट सातत्याने बाजारातून पैसे काढत आहेत. बफेट यांची जगप्रसिद्ध गुंतवणूक कंपनी बर्कशायर हॅथवेने २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत एक नवा ऐतिहासिक विक्रम नोंदवला आहे. कंपनीचा रोख साठा म्हणजेच कॅश रिझर्व्ह वाढून ३८१.७ अब्ज डॉलर्स इतका झाला आहे, जो आतापर्यंतचा कंपनीचा सर्वात मोठा रोख साठा आहे.
९५ वर्षीय वॉरेन बफेट कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून पायउतार होण्याची तयारी करत असताना हा अहवाल आला आहे. कंपनीनुसार, सीईओ म्हणून बफेट यांचा हा शेवटचा तिमाही निकाल असेल. बफेट यांनी स्पष्ट केले की, बाजारात असलेली अनिश्चितता आणि व्यापाराशी संबंधित सावधगिरी यामुळे कंपनीने या तिमाहीतही आक्रमक गुंतवणुकीपासून दूर राहणे पसंत केले.
विक्री अधिक, खरेदी कमी
बर्कशायर हॅथवेने सलग १२ व्या तिमाहीत जेवढे शेअर्स खरेदी केले, त्यापेक्षा जास्त शेअर्स विकले आहेत. कंपनीने या तिमाहीत ६.१ अब्ज डॉलर्स मूल्याचे शेअर्स विकले आहेत. विशेष म्हणजे, कंपनीने सलग पाचव्या तिमाहीत स्वतःचे शेअर्स बायबॅक केले नाहीत, तर याच दरम्यान कंपनीच्या शेअर्सची किंमत बाजाराच्या तुलनेत मागील काही महिन्यांत पिछाडीवर राहिली आहे.
यापूर्वी वर्षाच्या सुरुवातीला वॉरेन बफेट यांनी युनायटेड हेल्थ ग्रुपमध्ये १.६ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली होती आणि ऑक्सीकेम खरेदी करण्यासाठी ९.७ अब्ज डॉलर्सची ऑफर दिली होती. मे महिन्यात सीईओ पद सोडण्याची घोषणा केल्यापासून बर्कशायरचे शेअर्स सुमारे १२% नी घसरले आहेत.
विमा व्यवसायातून विक्रमी नफा
बर्कशायर हॅथवेचा ऑपरेटिंग प्रॉफिट ३४% नी वाढून १३.४९ अब्ज डॉलर्स वर पोहोचला आहे, जो विश्लेषकांच्या अंदाजित नफ्यापेक्षा खूप जास्त आहे. ही वाढ प्रामुख्याने विमा अंडररायटिंग व्यवसायातील उत्कृष्ट कामगिरीमुळे झाली आहे. कंपनीचे निव्वळ उत्पन्न देखील १७% नी वाढून ३०.८ अब्ज डॉलर्स झाले आहे. कंपनीची एकूण महसूल वाढ केवळ २% राहिली, जी अमेरिकेच्या आर्थिक विकास दरापेक्षा कमी आहे. कंपनीने कबूल केले की, ग्राहक विश्वासात घट आणि आर्थिक अनिश्चिततेचा व्यवसायावर परिणाम झाला आहे.
बफेट यांच्या निवृत्तीनंतर 'कॅश रिझर्व्ह'चे काय होणार?
९५ वर्षांचे वॉरेन बफेट आता सीईओ पद सोडत आहेत. कंपनीने पुष्टी केली आहे की, व्हाईस चेअरमन ग्रेग एबेल हे आता बर्कशायर हॅथवेची धुरा सांभाळतील. बफेट हे मात्र चेअरमन म्हणून कंपनीशी जोडलेले राहतील. विश्लेषकांना भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, बर्कशायरजवळ जमा असलेल्या ३८२ अब्ज डॉलर्सच्या रोख रकमेचे काय केले जाईल? काही तज्ज्ञांचे मत आहे की, कंपनीने सुमारे एक ट्रिलियन डॉलर्सचे मूल्यांकन पार केले आहे आणि आता १९६७ नंतर प्रथमच लाभांश देण्यावर विचार करू शकते.
वाचा - PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
बर्कशायर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा 'बॅरोमीटर'
अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील ओमाहा शहरात स्थित असलेल्या बर्कशायर हॅथवेला तेथील अर्थव्यवस्थेचा 'बॅरोमीटर' मानले जाते. कंपनीकडे विमा, रेल्वे, ऊर्जा आणि उत्पादन अशा अनेक महत्त्वाच्या व्यवसायांची मालकी आहे. त्यामुळे कंपनीचे तिमाही निकाल अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची गती कोणत्या दिशेने जात आहे, याचे संकेत देतात.
