Japan’s Biggest Rate Hike : सध्या जग मोठ्या आर्थिक उलथापालथीतून जात आहे. याचे हादरे बलाढ्य देशांनाही बसण्यास सुरुवात झाली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या जपानने शुक्रवारी आपल्या आर्थिक धोरणात ऐतिहासिक बदल केला आहे. 'बँक ऑफ जपान'ने व्याजदरात मोठी वाढ केली असून, गेल्या ३० वर्षांतील हा सर्वात मोठी 'दर वाढ' ठरली आहे. जपानने अनेक दशकांपासून सुरू असलेली 'शून्य व्याजदर' संस्कृती आता बंद केली असून, याचे पडसाद मुंबईपासून न्यूयॉर्कपर्यंतच्या शेअर बाजारांत उमटण्याची शक्यता आहे.
व्याजदरात ऐतिहासिक वाढ
बँक ऑफ जपानने शॉर्ट-टर्म व्याजदर ०.५% वरून वाढवून ०.७५% केले आहेत. १९९५ नंतरचे हे सर्वात उच्चांकी दर आहेत. जपानमध्ये महागाईचा दर सातत्याने २ टक्क्यांच्या उद्दिष्टापेक्षा वर राहिल्याने आणि मजुरीमध्ये वाढ झाल्याने बँकेला हे पाऊल उचलावे लागले आहे. नोव्हेंबर महिन्यात जपानची मूळ महागाई ३.०% नोंदवण्यात आली होती.
जागतिक बाजारावर 'कॅरी ट्रेड'चे संकट
जपानच्या या निर्णयाचा सर्वात मोठा परिणाम जागतिक 'कॅरी ट्रेड'वर होणार आहे. जागतिक गुंतवणूकदार जपानमधून अत्यंत कमी व्याजदरात कर्ज घेऊन ते पैसे अमेरिका, भारत किंवा युरोपसारख्या देशांच्या शेअर बाजारात आणि बॉण्ड्समध्ये गुंतवतात. याला 'कॅरी ट्रेड' म्हटले जाते. जपानमध्ये व्याजदर वाढल्याने हे 'स्वस्त कर्ज' आता महाग होणार आहे. यामुळे गुंतवणूकदार परदेशी बाजारांतून पैसे काढून जपानचे कर्ज फेडण्यासाठी घाई करतील. यामुळे भारत आणि अमेरिकेसारख्या उदयोन्मुख बाजारपेठांमधून मोठ्या प्रमाणात निधी बाहेर जाऊ शकतो, ज्यामुळे शेअर बाजारात मोठी पडझड होण्याची भीती आहे.
जागतिक बाजारपेठांवर होणारे ४ मोठे परिणाम
- बॉण्ड मार्केटमध्ये खळबळ : जपान हा जगातील सर्वात मोठा बॉण्ड गुंतवणूकदार आहे. आता मायदेशात व्याजदर वाढल्याने जपानी गुंतवणूकदार अमेरिकन आणि युरोपियन बॉण्ड्समधून पैसा काढून जपानमध्ये गुंतवतील. यामुळे अमेरिकेतील 'बॉण्ड यील्ड' वाढू शकते.
- येन मजबूत होणार : व्याजदर वाढल्याने जपानचे चलन 'येन' मजबूत होईल. यामुळे जपानमधून होणारी इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटो पार्ट्सची निर्यात महाग होईल, ज्याचा परिणाम जागतिक पुरवठा साखळीवर होईल.
- गुंतवणूकदारांचा कल बदलणार : जपानमधील कंपन्यांचे व्यावसायिक मनोबल गेल्या चार वर्षांत उच्चांकी पातळीवर आहे. यामुळे जागतिक गुंतवणूकदार आता आशियाई बाजारपेठांमध्ये जपानला अधिक पसंती देऊ शकतात.
- महागाई कमी होईल : येन कमकुवत असल्याने जपानला आयात महाग पडत होती, मात्र आता व्याजदर वाढल्याने येन सावरला तर जपानमधील महागाई कमी होण्यास मदत होईल.
गव्हर्नर काझुओ उएडा यांची कसरत
बँक ऑफ जपानचे गव्हर्नर काझुओ उएडा यांच्यासमोर दुहेरी आव्हान आहे. जर त्यांनी व्याजदर खूप वेगाने वाढवले, तर जपानच्या नाजूक अर्थव्यवस्थेला फटका बसू शकतो. मात्र, दर न वाढवल्यास येन कमकुवत होऊन महागाई वाढण्याची भीती आहे. उएडा यांनी संकेत दिले आहेत की, जर आर्थिक परिस्थिती स्थिर राहिली, तर भविष्यात व्याजदर १% ते २.५% पर्यंत नेले जाऊ शकतात.
