Sensex Will Go Above 1 Lakh: जागतिक वित्तीय फर्म मॉर्गन स्टॅनलीनं (Morgan Stanley) भारताच्या इक्विटी मार्केटबद्दल अत्यंत 'बुलिश' दृष्टिकोन स्वीकारला आहे. कंपनीचं म्हणणं आहे की, बाजारातील घसरणीचा टप्पा आता संपला आहे आणि जून २०२६ पर्यंत सेन्सेक्स १ लाख अंकांचा टप्पा गाठू शकतो. मॉर्गन स्टॅनलीनं या 'बुल केस' ला ३० टक्के शक्यता दिली आहे. कंपनीनं म्हटलंय की, ज्या कारणांमुळे भारत उदयोन्मुख बाजारांपेक्षा (Emerging Markets) मागे पडत होता, ती आता संपुष्टात येत आहेत.
भारताच्या वाढीचं चक्र वेग धरणार
रिपोर्टनुसार, भारताचं विकासाचं चक्र आता वेगाने पुढे सरकणार आहे. यामागे सरकारची सक्रिय धोरणं आणि आरबीआयची संभाव्य दिलासा देणारी धोरणं महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. मॉर्गन स्टॅनलीनं सांगितलं की, रिझर्व्ह बँक लवकरच 'रीफ्लेशन एफर्ट' अंतर्गत व्याजदरांमध्ये कपात, बँकिंग नियमांमध्ये शिथिलता आणि तरलता वाढवणं यांसारखी पावलं उचलू शकते. याव्यतिरिक्त, सरकारच्या भांडवली खर्चात वाढ आणि जीएसटीमध्ये संभाव्य कपात (सुमारे १.५ लाख कोटी रुपये, विशेषत: उपभोग्य वस्तूंवर) यामुळे अर्थव्यवस्थेला मोठे प्रोत्साहन मिळू शकतं.
कोणते घटक मदत करू शकतात?
मॉर्गन स्टॅनलीनं त्यांच्या अंदाजात बाह्य घटकांचाही समावेश केला आहे. रिपोर्टनुसार, चीनसोबतच्या संबंधांमध्ये होत असलेली सुधारणा आणि भारत-अमेरिका व्यापार कराराचे संभाव्य फायदे देशासाठी सकारात्मक ठरतील.
फर्मचं मत आहे की, महासाथीनंतर भारतानं अनुभवलेले जे कठोर व्यापक आर्थिक वातावरण होतं, ते आता बदलत आहे. तेलावरील कमी झालेले अवलंबित्व, सेवा निर्यातीतील वाढ आणि उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन यामुळे भारताची अर्थव्यवस्था अधिक स्थिर झाली आहे. परिणामी, उच्च व्याजदरांची गरज कमी होईल आणि बाजाराच्या मूल्यांकनात सुधारणा होईल, असंही त्यांनी म्हटलंय.
बेस केस ८९ हजार आणि बुल केस १ लाख
मॉर्गन स्टॅनलीनं त्यांच्या बेस केसमध्ये (ज्याची शक्यता ५० टक्के आहे) २०२६ च्या मध्यपर्यंत सेन्सेक्सचं लक्ष्य ८९,००० ठेवले आहे. तर, १ लाख अंकांचा बुल केस खालील गोष्टींवर अवलंबून आहे:
तेलाच्या किमती ६५ डॉलर प्रति बॅरलपेक्षा खाली राहणं.
जागतिक व्यापार तणावात (Global Trade Tension) घट.
कॉर्पोरेट उत्पन्नात (Corporate Earnings) वेगानं वाढ होणं.
एफपीआय (FPI) प्रवाहामुळे बाजाराला गती मिळेल
रिपोर्टनुसार, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांची (FPI) सध्याची स्थिती ऐतिहासिक दृष्ट्या खूप खालच्या पातळीवर आहे. त्यामुळे येणाऱ्या महिन्यांत मोठा भांडवली प्रवाह येण्याची अपेक्षा आहे. मॉर्गन स्टॅनलीनं त्यांच्या गुंतवणूक धोरणातही बदल केला आहे. ते आता बँकिंग, कंझ्युमर गुड्स आणि इंडस्ट्रियल्स सारख्या घरगुती क्षेत्रांना निर्यात-प्रधान क्षेत्रांपेक्षा अधिक प्राधान्य देत आहेत. हे सूचित करतं की फर्म भारताच्या अंतर्गत विकास क्षमतेवर विश्वास ठेवत आहे.
