Ather Energy IPO : इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी एथर एनर्जी आपला आयपीओ लाँच करण्याची तयारी करत आहे. पण, त्यापूर्वीच कंपनीसाठी बॅड न्यूज समोर आली आहे. या इश्यूचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये घसरले आहेत. २२ एप्रिल रोजी एथर एनर्जी आयपीओची घोषणा झाली, तेव्हा जीएमपी सुमारे १७ रुपये होता, जो आता एक अंकात घसरला आहे. इन्व्हेस्टरगेनडॉटकॉमच्या मते, एथर एनर्जीचा जीएमपी सध्या सुमारे ३ रुपये आहे, जो इश्यू किमतीपेक्षा फक्त ०.९३ टक्के जास्त आहे. एथर एनर्जीने त्यांच्या आयपीओसाठी ३०४-३२१ रुपये प्रति शेअर प्राइस बँड निश्चित केला आहे. गुंतवणूकदारांनी किमान ४६ इक्विटी शेअर्ससाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
एथर महाराष्ट्रात उभारणार प्रकल्प
एथर एनर्जी आयपीओमध्ये ८.१८ कोटी शेअर्सचा नवीन इश्यू आहे, ज्याची किंमत २,६२६ कोटी रुपये आहे. त्याच वेळी, ऑफर ऑफ सेल (OFS) १.१ कोटी शेअर्सची आहे. या संपूर्ण इश्यूचा आकार २,९८१ कोटी रुपये असेल. या आयपीओमध्ये, प्रमोटर्स तरुण संजय मेहता, स्वप्नील बबनलाल जैन आणि इतर कॉर्पोरेट शेअरहोल्डर्स OFS अंतर्गत त्यांच्या काही भागभांडवलाची विक्री करतील. एथर एनर्जीच्या मते, आयपीओद्वारे उभारण्यात येणारा निधी महाराष्ट्रात एक नवीन इलेक्ट्रिक दुचाकी वाहन उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी आणि त्याचे विद्यमान कर्ज कमी करण्यासाठी वापरला जाईल.
एथर कंपनी तोट्यात
कंपनीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (RHP) नुसार, एथर एनर्जी तोट्यात चालली आहे. आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये, एथर एनर्जीने १,०५९.७ कोटी रुपयांचा करपूर्व तोटा नोंदवला, जो आर्थिक वर्ष २३ मध्ये ८६४.५ कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष २२ मध्ये ३४४.१ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. आर्थिक वर्ष २४ मध्ये कंपनीचा महसूल १,७५३.८ कोटी रुपये होता, जो आर्थिक वर्ष २३ मध्ये नोंदवलेल्या १,७८०.९ कोटी रुपयांपेक्षा किंचित कमी आहे. कंपनीला भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेतही तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे तिच्या किंमत निर्धारण क्षमतेवर दबाव येऊ शकतो आणि नफ्याचे प्रमाण देखील कमी होऊ शकते.
जर इश्यू प्राइस बँड वरच्या टोकावर निश्चित केली तर कंपनीचे मूल्यांकन सुमारे ११,९५६ कोटी रुपये होते. कंपनी आयपीओमधून मिळणाऱ्या रकमेतून ७५० कोटी रुपये संशोधन आणि विकासासाठी (आर अँड डी) वाटप करण्याची योजना आखत आहे. वास्तविक, या गुंतवणुकीमुळे यशस्वी परिणाम मिळतील याची खात्री नसल्याचे एथरने मान्य केले. एथरचा व्यवसाय प्रामुख्याने दक्षिण भारतात केंद्रित आहे.
(Disclaimer: आयपीओमध्ये केलेली गुंतवणूक बाजारातील जोखमींच्या अधीन असते. जर तुम्हाला IPO मध्ये गुंतवणूक करायची असेल तर प्रथम प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या. तुमच्या कोणत्याही प्रकारच्या नफ्यासाठी किंवा तोट्यासाठी लोकमत जबाबदार राहणार नाही.)