नवी दिल्ली : दिलीप बिल्डकॉन आणि अल्फा अल्टरनेटिव्ह्स यांच्या संयुक्त भागीदारीत स्थापन झालेल्या ‘अनन्तम हायवेज इनविट’ने ‘एनएसई’ आणि ‘बीएसई’वर यशस्वीपणे नोंदणी केली असून, ४०० कोटी रुपयांची भांडवली उभारणी केली आहे. दिलीप बिल्डकॉनचा या इनविटमध्ये ७४ टक्के आणि अल्फा अल्टरनेटिव्ह्सचा २६ टक्के वाटा आहे.
सात हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल रस्तेप्रकल्पांचा ४,५०० कोटी रुपयांचा सध्याचा पोर्टफोलिओ असलेल्या या इनविटचा उद्देश पुढील दोन-तीन वर्षांत २०,००० ते ३०,००० कोटी रुपयांच्या मालमत्ता पोर्टफोलिओपर्यंत विस्तार करणे आहे. सार्वजनिक इश्श्यूला ५.६२ पट प्रतिसाद मिळाला असून, गुंतवणूकदारांचा उत्साह दिसून आला.
दिलीप बिल्डकॉनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिलीप सूर्यवंशी यांनी सांगितले की, ‘ही नोंदणी आमच्या दीर्घकालीन मूल्याधारित पायाभूत प्रकल्पनिर्मितीच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.’ सीईओ देवेंद्र जैन यांनी सांगितले की, ‘अल्फा अल्टरनेटिव्ह्ससोबतची भागीदारी आमच्या अंमलबजावणीच्या क्षमतेचा पुरावा आहे.’
‘अनन्तम इनविट’च्या माध्यमातून डीबीएलने आपले भांडवल पुनर्वापर धोरण अधिक बळकट करण्याचा मानस व्यक्त केला आहे. (वा.प्र.)