Ambuja Cement: उद्योगपती गौतम अदानी यांच्या सिमेंट व्यवसायाने जबरदस्त कामगिरी केली आहे. अदानी समूहाच्या मालकीची अंबुजा सिमेंट्स (Ambuja Cements) कंपनीने 2025-26 या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 4 पट नफा कमावून बाजार विश्लेषकांनाही चकित केले आहे.
नफा 268% वाढला
अंबुजा सिमेंट्सने सोमवारी जाहीर केलेल्या निकालांनुसार, कंपनीचा एकत्रित शुद्ध नफा (Net Profit) गेल्या वर्षाच्या तुलनेत 268% म्हणजेच जवळपास 4 पट वाढून ₹1,766 कोटींवर पोहोचला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा फक्त ₹479 कोटी होता. कंपनीच्या म्हणण्यानुसार, कर वजावटीनंतरचा नफा (Profit After Tax) थेट मालकांच्या खात्यात जमा झाला, ज्यामुळे कंपनीचा आर्थिक पाया अधिक मजबूत झाला आहे.
रेवेन्यूत 25% वाढ
कंपनीचे ऑपरेशनल रेवेन्यू दुसऱ्या तिमाहीत ₹9,130 कोटी इतके झाले असून, मागील वर्षी ते ₹7,305 कोटी होते. म्हणजेच, 25% ची वाढ नोंदवण्यात आली आहे. ही वाढ मुख्यतः उत्पादन आणि विक्रीत झालेल्या विक्रमी वाढीमुळे झाल्याचे कंपनीने सांगितले आहे.
रेकॉर्ड उत्पादनामुळे भरघोस उत्पन्न
समीक्षाधीन तिमाहीत अंबुजाने 16.6 दशलक्ष टन सिमेंटचे उत्पादन केले, जे आतापर्यंतचे सर्वोच्च आहे. हा आकडा गेल्या वर्षाच्या तुलनेत 20% अधिक असून, उद्योगातील सरासरी वाढीपेक्षा 5 पट जास्त असल्याचे कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
EBITDA आणि मार्जिनमध्ये वाढ
कंपनीचा प्रति मेट्रिक टन EBITDA ₹1,060 इतका नोंदवला गेला आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत 32% अधिक आहे. तर कंपनीचा ऑपरेटिंग मार्जिन 4.5% ने वाढून 19.2% झाला आहे. या तिमाहीत कंपनीची एकूण मालमत्ता (Total Assets) ₹3,057 कोटींनी वाढून ₹69,493 कोटींवर पोहोचली आहे. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, अंबुजा सिमेंट अजूनही कर्जमुक्त कंपनी आहे.
उच्च क्रेडिट रेटिंग कायम
कंपनीला CRISIL AAA (Stable) आणि CRISIL A1+ अशी सर्वोच्च रेटिंग प्राप्त झाली आहे, जी तिच्या मजबूत आर्थिक स्थितीचा पुरावा मानली जाते.
शेअर बाजारातही सकारात्मक प्रतिसाद
तिमाही निकालांच्या घोषणेनंतर अंबुजा सिमेंटच्या शेअर्समध्ये वाढ झाली. बीएसई (BSE) वरील आकडेवारीनुसार, दुपारी 2 वाजता शेअर 2% वाढीसह ₹576.40 वर व्यवहार करत होता. तर, दिवसाच्या सत्रात त्याने ₹582.70 चा उच्चांक गाठला. तज्ज्ञांच्या मते, कंपनीच्या मजबूत आर्थिक कामगिरीमुळे आगामी आठवड्यांत शेअरमध्ये आणखी तेजी दिसू शकते.
(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ञांचा सल्ला घ्या.)
