Adani Enterprises Q4: जबरदस्त तिमाही निकालानंतर अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरमध्ये आज जवळपास २% वाढ दिसून येत आहे. कामकाजादरम्यान कंपनीचा शेअर २३६० रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत आहे. कंपनीनं आर्थिक वर्ष २०२५ च्या चौथ्या तिमाहीचे निकाल १ मे रोजी जाहीर केले होते, ज्याचा परिणाम आज कंपनीच्या शेअरमध्ये दिसून येत आहे.
गौतम अदानी यांच्या अदानी एंटरप्रायझेसचा निव्वळ नफा चौथ्या तिमाहीत ७५२ टक्क्यांनी वाढून ३,८४५ कोटी रुपये झाला. गेल्या तिमाहीत हाच नफा ४५१ कोटी रुपये होता. या तिमाहीत एवढी मोठी वाढ होण्याचं प्रमुख कारण म्हणजे ३,२८६ कोटी रुपयांचं एक्सेप्शनल गेन.
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
ऑपरेशनल रेव्हेन्यूमध्ये घट
कमी व्यवसायामुळे, अदानी एंटरप्रायझेसचा ऑपरेशनल महसूल ८% ने कमी होऊन २६,९६६ कोटी रुपये झाला. विशेषतः त्याच्या IRM व्यवसायात घट झाली. तर दुसरीकडे चांगली बातमी अशी होती की या तिमाहीत कंपनीचा EBITDA १९% वाढून ४,३४६ कोटी रुपये झाला.
चौथ्या तिमाहीच्या निकालांवर गौतम अदानींनी प्रतिक्रिया दिली. आर्थिक वर्ष २५ मधील आमची मजबूत कामगिरी आमचा परफॉर्मन्स, वेग आणि शाश्वततेची ताकद दर्शवते. आमच्या इनक्युबेटिंग व्यवसायातील प्रभावी वाढ आमची शिस्तबद्ध अंमलबजावणी, भविष्य-केंद्रित गुंतवणूक आणि ऑपरेशनल उत्कृष्टतेसाठी वचनबद्धता दर्शवते असं ते म्हणाले. ऊर्जा बदल, विमानतळ, डेटा सेंटर आणि खाण सेवांमध्ये विस्तार करत असताना, आम्ही नवीन बाजारपेठेतील लीडर्स तयार करत आहोत जे येत्या दशकांमध्ये भारताच्या विकास प्रवासाला चालना देतील, असंही अदानींनी नमूद केलं.
कंपनी देणार डिविडेंड
अदानी एंटरप्रायझेसनं आर्थिक वर्ष २०२५ साठी प्रति शेअर १.३ रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला आहे आणि १३ जून ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. बोर्डानं १५,००० कोटी रुपये उभे करण्यासाठी इक्विटी इश्यूला देखील मान्यता दिली आहे, जी खाजगी प्लेसमेंट, क्यूआयपी (क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट) किंवा प्रेफरेंशियल इश्यूद्वारे उभारली जाईल.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)