Adani and Aditya Birla Group: सिमेंट क्षेत्रात छाप उमटवल्यानंतर आता गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूह आणि कुमार मंगलम बिर्ला यांचा आदित्य बिर्ला समूह वायर आणि केबल क्षेत्रात दमदार एंट्री करण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे, या दोन्ही समूहामध्ये तांबे आणि सिमेंट क्षेत्रात आधीपासून तगडी स्पर्धा सुरू आहे. आता ते वायर आणि केबल विभागात उतरणार आहेत.
या क्षेत्राची झपाट्याने वाढ
देशाच्या वायर आणि केबल उद्योगाच्या महसुलात 2019 आणि 2024 या आर्थिक वर्षांत 13 टक्क्याने वाढ झाली. आता या दोन मोठ्या समूहाने या विभागात उतरण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यात आणखी वाढ अपेक्षित आहे. याचा परिणाम शेअर बाजारातही दिसून येईल. वायर आणि केबल सेगमेंटमधील लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती 19 मार्चनंतर घसरल्या आहेत.
पॉलीकॅब इंडिया आणि या विभागातील सर्वात मोठी कंपनी केईआय इंडस्ट्रीजच्या शेअरच्या किमती 20 मार्च रोजी 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्या. तर, हॅवेल्सचे शेअर्सही 5 टक्क्यांनी घसरले. याशिवाय, फिनोलेक्स केबल्सचे शेअर्सही 4 टक्क्यांनी घसरले. मात्र, आता अदानी आणि बिर्ला समुहाच्या येण्याने शेअर्समध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे.
मोठ्या कंपन्यांसाठी आदर्श गुंतवणूक
ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलने वायर आणि केबल सेगमेंटला उच्च-भांडवल गुंतवणूकदारांसाठी आदर्श म्हणून वर्णन केले आहे. हा असा उद्योग आहे, जिथे कोणत्याही कंपनीचा वायरमध्ये 15 टक्क्यांपेक्षा जास्त आणि केबलमध्ये 20 टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा नाही, असे त्यांचे मत आहे.
वाढीच्या अनेक संधी
या उद्योगात लहान-मोठ्या एकूण कंपन्यांची संख्या सुमारे 400 असून महसूल 50-400 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. जागतिक ब्रोकरेज फर्म जेफरीजच्या मते, भारतातील अंदाजे 80,000 कोटी रुपयांच्या केबल आणि वायर उद्योगात (56,000 कोटी रुपयांची केबल आणि 24,000 कोटी रुपयांची वायर) आकर्षक संधी आहेत.
(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)