Vodafone Idea Share Price: मंगळवारी नव्या महिन्यात शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. सकाळी कामकाजादरम्यान सेन्सेक्समध्ये १००० अंकांपेक्षा अधिक घसरण झाली. तर निफ्टी सुमारे १३५ अंकांच्या घसरणीसह २३,३८५ वर व्यवहार करत होता. दरम्यान, व्होडाफोन-आयडिया या टेलिकॉम क्षेत्रातील कंपनीच्या शेअरमध्ये तुफान वाढ झाली आहे. आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात कंपनीच्या शेअर्सनं १० टक्क्यांचा उच्चांक गाठला.
स्पेक्ट्रम लिलावाच्या थकीत रकमेच्या तुलनेत ३६,९५० कोटी रुपयांच्या शेअर्सचं नव्यानं अधिग्रहण करून व्होडाफोन आयडियामधील हिस्सा ४८.९९ टक्क्यांपर्यंत वाढवण्यास सरकारनं सहमती दर्शविली आहे. सध्या कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या व्होडाफोन आयडियामध्ये सरकार २२.६ टक्के हिस्सेदारीसह सर्वात मोठा भागधारक आहे. व्होडाफोन आयडिया लिमिटेडनं (VIL) सरकारनं घेतलेल्या अतिरिक्त हिस्स्याबाबत शेअर बाजारांना माहिती दिली होती. ही बातमी समोर आल्यानंतर व्होडाफोन आयडियाचा शेअर मंगळवारी १० टक्क्यांच्या अपर सर्किटसह ७.४८ रुपयांवर उघडला, तर शुक्रवारी तो ६.८० रुपयांवर बंद झाला.
व्होडाफोन आयडिया होणार पीएसयू स्टॉक?
"सध्या व्होडाफोन आयडियाच्या शेअर्समध्ये सरकारचा २२.६ टक्के हिस्सा आहे. या इक्विटी रूपांतरणानंतर सरकारचा हिस्सा ४९ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. थकबाकीपोटी आणखी काही रूपांतर केल्यास सरकारचा हिस्सा ५० टक्क्यांहून अधिक होईल, ज्यामुळे व्होडाफोन आयडिया सार्वजनिक क्षेत्रातील युनिटमध्ये (पीएसयू) रुपांतरित होऊ शकते," अशी प्रतिक्रिया मोतीलाल ओसवालचे विश्लेषक आदित्य बन्सल यांनी दिली.
टार्गेट प्राईज काय?
विदेशी ब्रोकरेज कंपनी सिटीनं हाय रिस्क रेटिंग असलेल्या व्होडाफोन आयडियाच्या शेअर्सवर खरेदी करण्याची शिफारस केली असून प्रति शेअर १२ रुपये टार्गेट प्राईज ठेवलं आहे. दुसरीकडे, मॅक्वेरीनं न्यूट्रल कॉलचा पुनरुच्चार केला आहे आणि त्याला ७ रुपयांची टार्गेट प्राइज दिलीये. याशिवाय मोतीलाल ओसवाल यांनी या शेअरला हाय रिस्क म्हणत आपलं टार्गेट प्राइस ५ रुपयांवरून ६.५ रुपये केली आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)