Share Market Fall : भारतीय शेअर बाजारात सोमवारी (५ जानेवारी) कमालीची अस्थिरता पाहायला मिळाली. सत्राच्या सुरुवातीला निफ्टीने नवा ऐतिहासिक उच्चांक गाठल्यानंतर गुंतवणूकदारांनी नफेखोरीचा पवित्रा घेतला. यामुळे सेन्सेक्स ४०० अंकांनी गडगडला, तर निफ्टी २६,२५० च्या खाली घसरला. आयटी क्षेत्रातील विक्रीचा सपाटा आणि जागतिक तणावामुळे गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये एका झटक्यात स्वाहा झाले.
बाजाराची आजची स्थिती (दुपारी २:१५ वाजेपर्यंत)
बीएसई सेन्सेक्स : ४०३.६८ अंकांनी घसरून ८५,३५८.३३ वर.
निफ्टी ५० : १०३.६० अंकांनी घसरून २६,२२४.९५ वर.
दिवसातील उच्चांक : निफ्टीने २६,३७३.२० हा नवा 'लाईफ-टाइम हाय' गाठला होता.
बाजार घसरण्यामागची ३ प्रमुख कारणे
१. आयटी शेअर्समध्ये मोठी विक्री
निफ्टी आयटी इंडेक्समध्ये सुमारे २ टक्क्यांची घसरण झाली. विप्रो, एचसीएल टेक आणि इन्फोसिसचे शेअर्स ३ टक्क्यांपर्यंत कोसळले. 'सीएलएसए' या जागतिक ब्रोकरेज फर्मने भारतीय आयटी सेक्टरवर सावध पवित्रा घेतला असून तिसऱ्या तिमाहीचे निकाल कमकुवत राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.
२. ट्रम्प यांची 'टॅरिफ' धमकी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून सुरू ठेवलेल्या तेल खरेदीवर नाराजी व्यक्त केली आहे. "गरज पडल्यास भारतावर टॅरिफ (अतिरिक्त कर) वाढवू," अशा धमकीमुळे जागतिक बाजारात भारताच्या निर्यातीबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
३. रुपयाची ऐतिहासिक घसरण
डॉलरच्या तुलनेत रुपया आज ४ पैशांनी कमकुवत होऊन ९०.२४ च्या पातळीवर आला. जागतिक भू-राजकीय तणाव आणि डॉलरची वाढती मागणी यामुळे रुपयावर दबाव वाढला आहे, ज्याचा थेट परिणाम शेअर बाजारातील परदेशी गुंतवणुकीवर होत आहे.
वाचा - एकाच फंडातून शेअर्स, कर्ज आणि सोने-चांदीत गुंतवणूक; मल्टी अॅसेट फंडांचा २०२५ मध्ये १६% नफा
तांत्रिक विश्लेषण
तज्ज्ञांच्या मते, बाजारात सध्या 'वोलेटॅलिटी इंडेक्स' (VIX) उच्च स्तरावर आहे, जो आगामी काळात अधिक चढ-उताराचे संकेत देतो. निफ्टीसाठी २६,३८० ही महत्त्वाची अडथळा पातळी असून, खाली २६,२८८ वर आधार मिळण्याची शक्यता आहे.
