Armee infotech IPO: आयटी क्षेत्रातील कंपनी अरमी इन्फोटेक शेअर बाजारात लिस्ट होण्याची योजना आखत आहे. याअंतर्गत कंपनीनं सेबीकडे अर्ज केला आहे. कंपनी आयपीओच्या माध्यमातून ३०० कोटी रुपये उभारण्याच्या योजनेवर काम करत आहे. सेबीकडे सादर करण्यात आलेल्या मसुद्यानुसार, आयपीओमध्ये विक्रीसाठी कोणतीही ओएफएस नाही. यामध्ये नवीन इश्यूचा समावेश असेल. खांडवाला सिक्युरिटीज आणि केशर कॅपिटल अॅडव्हायझर्स यांची या इश्यूसाठी मर्चंट बँकर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
काय आहे कंपनीचा प्लॅन?
अरमी इन्फोटेकनं नवीन इश्यूच्या उत्पन्नातून १५५ कोटी रुपये नवीन सरकारी/ पीएसयू प्रकल्प खरेदी करून व्यवसाय वाढविण्यासाठी खर्च करण्याची योजना आखली आहे. आणखी ६० कोटी रुपये कार्यशील भांडवलाच्या गरजेसाठी आणि ८.९९ कोटी रुपये कर्जाच्या परतफेडीसाठी वापरले जातील.
गुजरातची आहे कंपनी
या कंपनीचं मुख्यालय गुजरातमध्ये आहे. आयटी, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक आणि गेमिंग, व्यावसायिक उत्पादानांमधील आपल्या अनुभव क्षेत्रांच्या माध्यमातून कंपनीनं किरकोळ विक्री क्षेत्रात एन्ट्री घेतली आहे. सोलर ईपीसी आणि पीपीएच्या माध्यमातून रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रात एन्ट्री घेतली आहे. त्याचा बहुतांश महसूल सध्या सरकारी/पीएसयू प्रकल्पांच्या सेवेतून मिळतो.
आर्थिक परिस्थिती कशी?
गेल्या काही वर्षांत कंपनीची आर्थिक कामगिरी भक्कम राहिली आहे. मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा निव्वळ नफा २०२.५ टक्क्यांनी वाढून ५०.१ कोटी रुपये आणि महसूल मागील वर्षाच्या तुलनेत १०३ टक्क्यांनी वाढून १,०२०.६ कोटी रुपये झाला आहे. आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या सहामाहीत ६०४.४ कोटी रुपयांच्या महसुलावर नफा १८.२१ कोटी रुपये होता. या कंपनीची स्थापना २००३ मध्ये झाली. भारतभरात १४ हून अधिक ठिकाणी त्यांची उपस्थिती आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)