seven days petrol will cost rs diesel price hiked rs | Petrol , Diesel Price : सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर भडकले, जाणून घ्या नवे दर?
Petrol , Diesel Price : सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर भडकले, जाणून घ्या नवे दर?

नवी दिल्लीः सौदी अरेबियातील प्रकल्पांवर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात पाच टक्क्यांची घट झाली आहे. त्याचा परिणाम भारतातल्या पेट्रोल, डिझेलच्या दरावर झाला असून, पेट्रोल आणि डिझेलचे दर आजही भडकले आहेत. सोमवारी राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर प्रतिलिटरमागे 29 पैसे आणि डिझेलचे दर प्रतिलिटरमागे 19 पैशांनी वाढले आहेत. तर रविवारी राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दरात 27 पैसे प्रतिलिटर आणि डिझेलच्या दरात 21 पैसे प्रतिलिटर वाढ नोंदवली गेली होती. मुंबईत पेट्रोलची किंमत 28 पैशांनी वाढली असून, प्रतिलिटर दर 79.57 रुपये झाले आहेत. तर डिझेलमध्येही 21 पैशांची वाढ होऊन प्रतिलिटर दर 70.22 रुपयांवर पोहोचले आहेत. 

इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, सोमवारी दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नईत पेट्रोलचे दर क्रमशः वाढून 73.91 रुपये, 79.57 रुपये, 76.60 रुपये आणि 76.83 रुपये प्रति लीटर झाले आहेत. तर या चार महानगरांत डिझेलचे दर वाढून क्रमशः  66.93 रुपये, 70.22 रुपये, 69.35 रुपये आणि 70.76 रुपये प्रति लीटर झाले आहेत. पेट्रोल-डिझेलचे दर प्रत्येक दिवशी वाढत चालले आहेत. पेट्रोल-डिझेलचा नवा दर सकाळी सहा वाजता लागू होतो. त्यावर एक्साइज ड्युटी, डीलर कमिशन जोडल्यानंतर हे दर जवळपास दुप्पट होतात. 

 गेल्या सहा दिवसांत दिल्लीत पेट्रोलचे दर 1.59 रुपये, तर डिझेलचे दर 1.31 रुपये प्रति लीटरने वाढले आहेत. 2017पासून पेट्रोलचे दर दररोज ठरवले जात आहेत. तेव्हापासूनची ही सर्वात मोठी वाढ आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिसूचनेनुसार इंधनाच्या दरात सलग सातव्या दिवशी वाढ झाली आहे. 17 सप्टेंबरपासून पेट्रोलच्या दरात एकूण 1.59 रुपयांची वाढ झाली आहे. याच काळात डिझेल 1.31 रुपयांनी महागले आहे. अर्थात, सौदी अरेबियाने स्पष्ट केले आहे की, पुरवठा लवकरच सामान्य केला जाईल, पण तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, याचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर अनेक वर्षे दिसून येईल.

  • सौदीतून भारताला किती होतो तेलपुरवठा?

भारत आपल्या गरजेपैकी 83 टक्के तेल आयात करतो. भारत आपल्या तेल आयातीपैकी पाचव्या हिश्श्यासाठी सौदीवर अवलंबून आहे. सौदी हा भारताचा सर्वात मोठा दुसरा तेल पुरवठादार आहे. सौदी अरेबियाकडून भारताला दर महिन्याला 20 लाख टन कच्च्या तेलाचा पुरवठा केला जातो. सप्टेंबर महिन्यात यातील 12 ते 13 लाख टनांचा पुरवठा झाला आहे. उर्वरित पुरवठा लवकरच मिळण्याची अपेक्षा आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सौदी अरेबियाच्या मंत्र्यांशी याबाबत चर्चा केली आहे. भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा कायम ठेवण्याचा विश्वास सौदीने व्यक्त केला आहे.

English summary :
Petrol Diesel Price Hike : Worldwide crude oil supply has declined by five percent due to drone strikes on Saudi Arabia. As a result, petrol and diesel prices in India is affected.


Web Title: seven days petrol will cost rs diesel price hiked rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.