जर तुम्हाला सोने-चांदी खरेदी करायचे असेल, परंतु ते फिजिकल स्वरुपात जवळ ठेवायचे नसेल, तर म्युच्युअल फंड हा एक सोपा मार्ग आहे. तुम्ही एक्सचेंज ट्रेडेड फंड (ETF) किंवा फंड-ऑफ-फंड्स (FoF) मध्ये गुंतवणूक करू शकता. जेव्हा तुम्ही यामध्ये पैसे गुंतवता, तेव्हा तुम्हाला त्या योजनेच्या एनएव्हीच्या (NAV) आधारावर युनिट्स मिळतात. या योजना प्रत्यक्ष सोने-चांदीच्या भौतिक मालक असतात, त्यामुळे त्यांची एनएव्ही धातूंच्या किमतींनुसार कमी-जास्त होते. अशा प्रकारे तुम्ही सोने-चांदी थेट न खरेदी करता त्यात गुंतवणूक करू शकता. विशेष म्हणजे, गेल्या एका वर्षात सोन्यानं ७३% आणि चांदीने १६१% परतावा दिला आहे. तसेच, तीन वर्षांचा वार्षिक परतावा पाहिला तर सोन्याने ३२.९८% आणि चांदीने ४८.७७% परतावा दिला आहे.
सोने-चांदीसाठी आणखी काही म्युच्युअल फंड पर्याय आहेत का?
हो, ईटीएफ आणि एफओएफ व्यतिरिक्त अनेक फंड हाऊस 'मल्टी-ॲसेट अलोकेशन फंड' देखील चालवतात. हे फंड सहसा आपला १० ते २५ टक्के हिस्सा सोन्या-चांदीमध्ये गुंतवतात आणि उर्वरित भाग शेअर्स आणि डेटमध्ये. यामुळे तुम्हाला वैविध्य मिळते आणि पोर्टफोलिओ आपोआप संतुलित होतो. मात्र, हे लक्षात ठेवा की या फंडांमध्ये सोने-चांदीचा हिस्सा मर्यादित असतो, त्यामुळे या धातूंच्या किमतीत मोठी वाढ झाली तरी त्याचा पूर्ण फायदा मिळू शकत नाही.
मुंबईत ७५ वर्ष जुन्या हेरिटेज बंगल्याची २५० कोटींना होणार विक्री; कोणाची आहे मालकी आणि काय आहे खास?
SIP द्वारे गुंतवणूक करता येते का?
हो, नक्कीच. तुम्ही या फंडांमध्ये एकरकमी (Lump Sum) गुंतवणुकीसोबतच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) किंवा सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन (STP) देखील निवडू शकता. यामध्ये गुंतवणुकीची कोणतीही उच्च मर्यादा नाही, तुम्ही हवी तितकी गुंतवणूक करू शकता.
सोने-चांदीच्या फंडांवर टॅक्स कसा लागतो?
जर तुम्ही सोने किंवा चांदीच्या ईटीएफमध्ये गुंतवणूक केली, तर १२ महिन्यांच्या आत विकलेल्या युनिट्सवर होणारा नफा तुमच्या टॅक्स स्लॅबनुसार करपात्र असेल. तर, जर तुम्ही युनिट्स १२ महिन्यांपेक्षा जास्त काळ जवळ ठेवले, तर त्यावर १२.५ टक्के दरानं लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागेल.
फंड-ऑफ-फंड्स (FoF) च्या बाबतीत, जर तुम्ही २४ महिन्यांपेक्षा जास्त काळ गुंतवणूक ठेवली, तर टॅक्स १२.५ टक्के असेल. त्यापेक्षा कमी कालावधीत विक्री केल्यास तुमच्या टॅक्स स्लॅबनुसार कर भरावा लागेल.
तज्ज्ञ काय म्हणतात?
तज्ज्ञ एकरकमी गुंतवणुकीऐवजी घसरण झाल्यावर खरेदी करा (Buy on dips) अशी रणनीती अवलंबण्याचा सल्ला देतात. ते मागील परताव्याच्या मागे धावण्यास मनाई करतात. त्यांच्या मते, आपल्या एकूण पोर्टफोलिओच्या केवळ १० ते १५ टक्के हिस्साच या धातूंमध्ये गुंतवावा. यापैकी साधारणपणे १० टक्के भाग बाजारातील अस्थिरता किंवा भू-राजकीय जोखमीच्या वेळी सुरक्षितता म्हणून सोन्यात, आणि ३ ते ५ टक्के भाग चांदीमध्ये गुंतवला जाऊ शकतो, कारण चांदी जास्त अस्थिर असते. ही गुंतवणूक तुम्ही सहा महिन्यांच्या कालावधीत हळूहळू, एसआयपी, एसटीपी किंवा किमती कमी झाल्यावर हप्त्यांमध्ये करू शकता.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
