Women Investmet Scheme: महिलांना चांगली आर्थिक सुरक्षा देण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सरकार वेळोवेळी महिलांच्या गरजेनुसार बचत योजनाही आणत आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात सरकारनं 'महिला सन्मान बचत योजना' (Mahila Sanman Bachat Scheme) ही मोठी बचत योजना आणली होती. ही योजना विशेषत: महिला आणि मुलींसाठी होती. या बचत योजनेत २ वर्षांच्या लॉक-इनवर बँक एफडीपेक्षा जास्त परतावा मिळत आहे. महिला सन्मान बचत योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२५ आहे. चला तर मग जाणून घेऊया या बचत योजनेबद्दल अधिक माहिती.
लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
७.५ टक्के दरानं व्याज
महिला सन्मान बचत योजनेअंतर्गत जमा रकमेवर वार्षिक ७.५ टक्के दरानं व्याज मिळत आहे. हे व्याज त्रैमासिक आधारावर दिलं जातं. ही रक्कम खात्यात जमा केली जाते आणि बंद होताना दिली जाते. या योजनेवर देण्यात येणारं व्याज सध्या २ वर्षांच्या बँक एफडीपेक्षा जास्त आहे. उदाहरणार्थ, एसबीआय दोन वर्षांच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना ६.८०% आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.३०% दरानं व्याज देत आहे. एचडीएफसी बँक सामान्य ग्राहकांना ७% आणि ज्येष्ठ नागरिकांना ७.५०% दरानं व्याज देत आहे.
गुंतवणूक कोण करू शकेल?
महिला सन्मान बचत योजनेतील गुंतवणूक महिला स्वत:च्या नावानं करू शकतात. याशिवाय अल्पवयीन मुलीच्या वतीनं पालक खातं उघडू शकतात.
किती रक्कम गुंतवता येते?
या बचत योजनेत किमान एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दोन लाख रुपयांच्या गुंतवणुकीची मर्यादा आहे. खातं उघडण्यासाठी अर्जदाराला खातं उघडण्याचा फॉर्म, केवायसी कागदपत्रे (आधार आणि पॅन कार्ड), नवीन खातेदारांसाठी केवायसी फॉर्म आणि पे-इन स्लिप डिपॉझिट रक्कम किंवा चेकसह जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँक शाखेत जमा करावी लागेल.